नंदुरबार जिल्हा

तळोदा-रेवानगर रस्‍त्‍यावर भीषण अपघात; जीपने दुचाकीला उडवले, १७ वर्षीय तरुणाचा बळी; दोन गंभीर जखमी

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : बोलेरो जीपने दुचाकीला दिलेल्‍या जबर धडकेत १७ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू झाल्‍याची दुर्दैवी घटना तळोदा तालुक्‍यात घडली. या अपघातात दोन तरुण जखमी झाले असून, जीपचालकाविरोधात तळोदा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
तळोदा-रेवानगर रस्‍त्‍यावर दलेलपूर ते रानमहू गावादरम्‍यान फरशी पुलाजवळ २१ मार्चला संध्‍याकाळी ६.३० वाजेच्‍या सुमारास ही घटना घडली. अविनाश ओंकार नाईक (१७, रा. काठी, ता. अक्‍कलकुवा, हल्‍ली मुक्‍काम रोझवा पुनर्वसन क्र. ४, ता. तळोदा) असे या अपघातात ठार झालेल्‍या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तर पोपी लालश्‍या पावरा व रोशन सायका पावरा (दोघेही रा. रोझवा पुनर्वसन क्र. ४) हे दोघे गंभीर जखमी झाले.
हे तिघेही त्‍यांच्‍या दुचाकीवर (क्र. जीजे १९ सी २६७१) बसून तळोदाहून रेवानगरकडे जात असताना विरूद्ध दिशेने येणार्‍या बोलेरो जीपने (क्र. एमएच १६ एबी ४४२१) त्‍यांच्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिन्‍ही तरुण रस्‍त्‍यावर फेकले गेले. यात अविनाश याला गंभीर दुखापती झाल्‍याने त्‍याला नंदुरबारच्‍या स्‍मित रुग्‍णालयात उपचारासाठी हलविण्‍यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना २३ मार्च रोजी त्‍याचा मृत्‍यू झाला. दरम्‍यान, या प्रकरणी अविनाशचे वडिल ओंकार तुकाराम नाईक यांनी तळोदा पोलिस ठाण्‍यात दिलेल्‍या तक्रारीवरून बोलेरो जीपच्‍या चालकाविरोधात (नाव माहिती नाही) गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय नाईक हे करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button