नवापूरचा आदिवासी साखर कारखाना जप्त; १०.५१ कोटींचे कर्ज थकवल्याचा बसला फटका; जिल्हा बँकेने घेतला ताबा

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या २६ पैकी २४ वर्षे अविरत सुरू असलेला नवापूरचा आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १० कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज थकल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या कारखान्याला सील ठोकत तेथील मालमत्ता जप्त केल्या आहेत. जिल्हा बँकेचे पथक आणि नवापूरचे तहसीलदार यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
नवापूरसह जिल्ह्यातील आदिवासींच्या उन्नतीसाठी माजी मंत्री सुरूपसिंग नाईक आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांनी २६ वर्षांपूर्वी नवापूरमधील डोकारे येथे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची मुहुर्तमेढ रोवली होती. त्यानंतर सलग २४ वर्षे हा कारखाना अविरतपणे सुरू होता. परंतु शेवटच्या काही काळात कारखान्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आणि गेल्या दोन वर्षांपासून हा कारखाना बंदच होता.
दरम्यानच्या काळात कारखान्याने धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १० कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात कारखान्याच्या काही मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, कारखाना बंद असल्याने या रकमेची परतफेडच होऊ शकली नाही. यामुळे बँकेने कारखाना प्रशासनाकडे वसुलीसाठी तगादा लावला होता तसेच जप्तीची नोटीसही बजावली होती. हा कारखाना चालविण्यास घेतलेल्या द्वारकाधिश साखर कारखान्याने जिल्हा बँकेने सुरू केलेल्या कारवाईस विरोध करीत छत्रपती संभाजीनगर येथील ऋण वसुली प्राधिकरणाकडे धाव घेत कारवाई थांबविण्याचे प्रयत्न केले. मात्र, ऋण वसुली प्राधिकरणाने त्यांचा दावा फेटाळल्याने कारखाना जप्तीवर शिक्कामोर्तब झाले होते.
त्यानुसार, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि. २४) जिल्हा बँकेचे पथक नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्यासोबत कारखान्यावर पोहोचले. यावेळी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या सहकार्यांनी बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या पथकाने कारखान्याचे मुख्य कार्यालय तसेच प्रवेशद्वाराला सील ठोकून तो ताब्यात घेतला.
ही मालमत्ता झाली जप्त
यावेळी कारखान्याची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. कारखान्याची डोकारे येथील मुख्य साईट, वाहनतळ, पेट्रोलपंप, इटीपी विभाग, परिसरातील मंदिर, शैक्षणिक संकुल, शेतकी निवास, कर्मचारी वसाहत, नर्सिंग वृक्ष लागवडीसाठीची जमीन, प्रेसमड आणि राख साठवणूक जागा यासह अन्य काही मालमत्ता यावेळी जप्त करण्यात आल्या.
आदिवासी सहकारी साखर कारखाना जप्तीच्या कारवाईत निवासी नायब तहसीलदार पी.एस. मराठे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी, पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, बँकेचे अधिकारी हिंमतराव बेडसे, विलास पाटील, राजेंद्र राजपूत, भगवान बाविस्कर, प्रकाश वळवी, डी.डी. वसावे, एन.टी. गावित, आर.एस. वळवी, महसूल कर्मचारी प्रशांत देवरे, जगदिश जाधव, उमेश पाडवी, विनायक गावित, रमेश वसावे आदींनी सहभाग घेतला होता.



