महाराष्ट्र

महिनाभरापासूनची दहशत संपुष्‍टात; नरभक्षक बिबट्या जेरबंद, नवापूरकरांनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : गेल्‍या महिनाभरापासून तालुक्‍यातील अनेक ठिकाणी पाळीव प्राण्‍यांवर हल्‍ले करून त्‍यांचा फडशा पाडत दहशत माजवणार्‍या बिबट्याला जेरबंद करण्‍यात यश आल्‍याने नवापूर तालुकावासीयांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला आहे. तालुक्‍यालगत असलेल्‍या सुंदरपूर शिवारात या नरभक्षक बिबट्याला पकडण्‍यात गुजरात वनविभागाला सोमवारी (दि. २३) रात्री उशीरा यश आले.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गेल्‍या महिनाभरापासून नवापूर तालुक्‍यासह तालुक्‍याला लागून असलेल्‍या गुजरातेतील सुंदरपूर शिवारात बिबट्याने दहशत माजवली होती. या बिबट्याने या काळात शेळ्‍या-मेंढ्यांसह अनेक पाळीव प्राण्‍यांवर हल्‍ले करून त्‍यांचा फडशा पाडला होता. बिबट्या थेट नागरी वस्‍तीत शिरून पाळीव प्राण्‍यांवर हल्‍ले करीत असल्‍याने तालुक्‍यातील शेतकर्‍यांना रात्रीच्‍या वेळी शेतात जाणे तसेच लोकांना घराबाहेर पडण्‍याची देखील भिती वाटत होती. बिबट्याच्‍या दहशतीने हैराण झालेल्‍या तालुक्‍यातील अनेक ठिकाणच्‍या ग्रामस्‍थांनी वनविभागाकडे तक्रारी करून बिबट्याच्‍या बंदोबस्‍ताची मागणी केली हाती.
या पार्श्वभूमीवर महाराष्‍ट्र आणि गुजरात या दोन्‍ही राज्‍यांच्‍या वनविभागाने बिबट्याला पकडण्‍यासाठी सीमावर्ती भागात ठिकठिकाणी पिंजरे लावले होते. यापैकी गुजरात वनविभागाने सुंदरपूर शिवारात लावलेल्‍या एका पिंजर्‍यात सोमवारी रात्री उशीरा एक बिबट्या अडकला. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाच्‍या कर्मचार्‍यांनी या बिबट्याला ताब्‍यात घेऊन त्‍याची वैद्यकीय तपासणी केली. सध्‍या हा बिबट्या गुजरात वनविभागाच्‍या ताब्‍यात असून, लवकरच त्‍याला मानवी वस्‍तीपासून दूर असलेल्‍या घनदाट जंगलात सोडण्‍यात येईल, असे सांगण्‍यात आले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button