‘त्या’ बदनामीकारक वृत्ताने नंदुरबार पोलिसांचा संताप; यापुढे खोटी बातमी प्रकाशित, प्रसारित केल्यास दिला कारवाईचा इशारा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा कट रचल्याबाबत गुन्हा दाखल झाल्याची खोटी बातमी आणि व्हिडिओ काही वृत्तपत्रे व समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे जिल्हा पोलिस दल संतापले आहे. कोणतीही खात्री न करता बदनामीकारक बातमी प्रसारित करणार्या प्रसार माध्यमांना थेट कारवाईचा इशाराच पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी काही वृत्तपत्रे तसेच यूट्यूब चॅनेल्सने नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील या अधिकार्यांवर हल्ल्याचा कट रचल्याबाबत गुन्हा दाखल झाल्याची बातमी प्रकाशित केली होती. मात्र, ही बातमी धादांत खोटी असून, हे वृत्त देणारे वृत्तपत्रे व यूट्युब चॅनल्सने बातमी प्रकाशित, प्रसारित करण्याआधी कोणतीही शहानिशा केली नव्हती, असे जिल्हा पोलिस दलाने स्पष्ट केले आहे. तसेच ही बातमी प्रकाशित, प्रसारित झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने संबंधित संपादक व माध्यम प्रतिनिधींशी संपर्क साधून ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे स्पष्ट केले. तसेच भविष्यात कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून खात्री करूनच ती प्रसिद्ध करावी, असे निर्देशही संबंधितांना दिल्याचे पोलिस दलाच्या जनसंपर्क अधिकार्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
खात्री करून घेण्याचे आवाहन
कोणतीही संवेदनशील माहिती प्रसारित करण्यापूर्वी संबंधित कार्यालयाकडून सत्यता पडताळून घ्यावी. अफवा किंवा अप्रमाणित माहितीमुळे समाजात भीती व गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे जबाबदारीने वृत्तांकन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही जिल्हा पोलीस विभागाने सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांना केले आहे. सदर खोटी बातमी व व्हिडिओ प्रसारित केलेल्या माध्यमांनी तत्काळ तो मजकूर हटवून स्पष्टीकरणानंतर दुरुस्ती करावी, अशी सूचनाही पोलीस प्रशासनाने संबंधितांना केली आहे. एवढेच नव्हे तर यापुढे पोलिस दलाची प्रतिमा कलंकित होईल, अशी कोणत्याही प्रकारची अप्रमाणित व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नंदुरबार जिल्हा पोलिस प्रशासनाने दिला आहे.



