तळोदातील सहा. प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत यांना बेड्या; २५ लाखांचा गैरव्यवहार भोवला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांची कारवाई

तळोदा / छत्रपती संभाजीनगर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत असताना शासकीय वसतिगृहाच्या भोजन पुरवठा देयकात झालेल्या सुमारे २५ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम नागोजी राऊत यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २४) तळोदात दाखल झालेल्या छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून, यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस राऊत यांना छत्रपती संभाजीनगरला घेऊन गेले असून, आज (बुधवार) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत चालवल्या जाणार्या शासकीय वसतिगृहांती भोजन पुरवठा देयकांममध्ये २० ते २५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. २०१६ ते २०२० या कालावधीत झालेल्या या गैरव्यवहार प्रकरणात त्यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे गृहप्रमुख/ गृहपालपदी कार्यरत असलेले उत्तम राऊत यांच्यासह एकूण पाच अधिकार्यांवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार १३ जून २०२५ रोजी स्थानिक पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट हजेरीपत्रके तयार करून विद्यार्थ्यांची संख्या कृत्रिमरीत्या वाढवून दाखवली आणि त्याआधारे भोजन पुरवठ्याचे खोटे देयक सादर करून शासनाकडून निधी काढून सुमारे २० ते २५ रुपयांचा गैरव्यवहार करीत शासनाची फसवणूक केली, अशा फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. दिलीप नारायण खोकले (तत्कालीन सहाय्यक प्रकल्प अधिकारी), उत्तम नागोजी राऊत (तत्कालीन गृहप्रमुख/गृहपाल, सध्या कार्यरत तळोदा प्रकल्प कार्यालय), सुरेंद्र अंबादास कावरे, शाम बबनराव देशमुख, बळीराम भिवाजी गडमे अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकार्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०९, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) आणि ३४ अन्वये हा गुन्हा दाखल झाला होता.
याच गुन्ह्यात उत्तम राऊत यांना ताब्यात घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव व पोलिस अंमलदार अंकुश वाघ मंगळवारी अचानक तळोदात दाखल झाले होते. येथे येताच त्यांनी कुणालाही कारवाईचा मागमूस लागू न देता थेट एकात्मिक विकास प्रकल्पाचे कार्यालय गाठून राऊत यांच्यावर अटकेची कारवाई केली. लगोलग राऊत यांना घेऊन पोलिस छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. आज, बुधवारी त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या अटकेच्या कारवाईची चर्चा दिवसभर या प्रकल्प कार्यालय व परिसरात होती.
—————————————————
उत्तम राऊत आणि इतरांवर छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात राऊत यांना तळोदा प्रकल्प कार्यालयातून मंगळवारी ताब्यात घेतले. आज (बुधवारी) त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.
– विनोद भालेराव (पोलिस उपनिरीक्षक)
—————————————————-
छत्रपती संभाजीनगर येथे दाखल गुन्ह्याचा संदर्भ देत तेथून आलेल्या पोलिसांनी सहायक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास छत्रपती संभाजीनगरचे पोलिस करीत आहेत.
– अनय नावंदर (प्रकल्प अधिकारी, तळोदा)



