गुन्हे वार्ता

शहाद्यात भिकार्‍याचा संशयास्पद मृत्यू; बाजार समिती आवारात आढळला मृतदेह, कारण अस्‍पष्‍ट, पोलिसांकडून तपास सुरू

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुरुषोत्तम मार्केट क्रमांक १ परिसरात बुधवारी (दि. २५) सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कैलास त्र्यंबक पाटील (५५) असे या व्‍यक्‍तीचे नाव असून, तो भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्‍याचा मृत्‍यू नेमका कशामुळे झाला, याची सध्‍या चौकशी सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजेच्‍या सुमारास बाजार समिती परिसरात नागरिकांना पाटील मृतावस्थेत आढळून आले. याबाबतची माहिती मिळताच इन्कलाब फाउंडेशनचे कार्यकर्ते संदीप सिंग राजपाल, दीपक शिंदे आणि गणेश सोनार यांनी तत्‍काळ शहादा पोलिसांना याबाबत कळवले.
पोलिसांच्‍या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक पाहणीत पाटील यांच्‍या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येण्याची शक्यता आहे. दरम्‍यान, हा घात, अपघात की नैसर्गिक मृत्‍यू, या चर्चेला सध्‍या बाजार समिती आवारासह शहरात उत आला आहे. तूर्तास, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, मृत्यूमागील कारणाचा उलगडा लवकरच होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button