ॲडव्हान्सशिवाय कंपन्या इंधन देईनात अन् इकडे गर्दी थांबेना; साठा नसल्याने नंदुरबारमध्ये १४ पेट्रोलपंप पडले बंद; पंपधारक वैतागले

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आगाऊ रक्कम भरल्याशिवाय कंपन्यांकडून मिळत नसलेला इंधनाचा साठा, सणवारामुळे सुट्या आल्याने बँकिंग व्यवहार थांबून कंपन्यांना पैसे पाठविण्यात येत असलेली अडचण आणि त्यात अफवांच्या गर्तेत अडकलेल्या वाहनधारकांकडून इंधनाचा अतिरिक्त साठा खरेदीसाठी होणारी गर्दी अशा तिहेरी कोंडीत नंदुरबार जिल्ह्यातील पेट्रोलपंपधारक अडकल्याची माहिती समोर आली आहे. सुट्यामुळे पैसे न भरल्याने साठा उपलब्ध न झाल्याने मंगळवारी दुपारनंतर तब्बल १४ पेट्रोलपंप बंद करावे लागले होते. आता इंधनाचा पुरवठा कधी पूर्ववत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मात्र जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे सांगत आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सहा इंधन पुरवठादार कंपन्यांचे ८१ पेट्रोलपंप आहेत. यामध्ये एचपी, बीपीसीएल, आयओसीएल, एस्सार, नायरा आणि रिलायन्स या कंपन्यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक पेट्रोलपंप शहादा व नंदुरबार तालुक्यात आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलचा काळाबाजार होऊ नये, यासाठी इंधन पुरवठादार कंपन्यांनी आगाऊ रक्कम भरल्याशिवाय पेट्रोल पंपांना पेट्रोल-डिझेलचे टँकर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस सुटी आल्याने बँकिंग व्यवहारांत अडचण आली. परिणामी जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंप चालकांना पुरवठादार कंपन्यांकडे पेट्रोल-डिझेल खरेदीपोटी आगाऊ रक्कम पाठवता आली नाही. यामुळे कंपन्यांचे इंधनाने भरलेले टँकर्स नंदुरबारकडे रवाना होऊ शकले नव्हते.
या सगळ्यांचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवरील साठा मर्यादित झाला. त्यामुळे सोमवारी संध्याकाळीच काही पेट्रोल पंप इंधन संपल्याने बंद करावे लागले. मंगळवारी आणखी १४ पेट्रोलपंप साठ्याअभावी बंद करावे लागले. त्यातच सोमवारीच पेट्रोल – डिझेल संपणार, दरवाढही होणार अशी अफवा पसरली. ही चर्चा वेगात पसरल्याने पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी अचानक गर्दी सुरू केली. पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंगळवारीही हे चित्र कायम होते.
नंदुरबार जिल्ह्याला दररोज २.५ लाख लिटर पेट्रोल लागते. ८१ पंपांच्या माध्यमातून ही गरज भागवली जाते. मात्र, पुरवठ्यात आलेली तूट आणि त्यातच इंधन टंचाईच्या अफवेमुळे पंपचालकांवर ताण आला होता. अशा कोंडीत अडकलेले पेट्रोल पंपचालक वैतागले असून, सोबतच वाहनाशिवाय कॅन, ड्रम यामध्ये पेट्रोल-डिझेल भरून दिले जात नसल्याने वाहनधारक वादही घालताना दिसत आहेत. या सार्यात वाहनधारकांची गर्दी आवरताना, त्यांची समजूत घालताना पंपचालकांच्या नाकीनऊ येत असल्याचे एका पेट्रोलपंप चालकाने ‘नंदुरबार पोस्ट’ला सांगितले.
चिंता नको, पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हा प्रशासन
नंदुरबार जिल्ह्यात इंधनाची टंचाई नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंधनाची वाहने वेळेत न आल्याने थोडी तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच वाहनधारक अतिरिक्त साठा करून घेत असल्याने टंचाईसदृश स्थिती आहे. मात्र, इंधनाचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असून, लोकांनी गरजेपुरतेच इंधन खरेदी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी केले आहे.



