नंदुरबार जिल्हा

ॲसिड हल्‍ला पीडितेसाठी शहाद्यातील सुवर्णकार मैदानात; आरोपीला अटक करून ईश्‍वरीला न्‍याय देण्‍याची प्रशासनाकडे मागणी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अहिल्‍यानर जिल्‍ह्याच्‍या संगमनेर तालुक्‍यात ॲसिड हल्‍ला झालेल्‍या अवघ्‍या १२ वर्षांच्‍या ईश्‍वरी संजय डहाळे या पीडित मुलीला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी शहादा येथील सुवर्णकार समाज मैदानात उतरला आहे. या हल्‍ल्‍याचा निषेध करतानाच शहादा सुवर्णकार समाजाने आरोपीला अटक आणि कडक शिक्षा करून पीडित मुलीला न्‍याय देण्‍याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील सुवर्णकार समाजातील संजय डहाळे यांची कन्या ईश्वरी संजय डहाळे (इयत्ता ६ वी) हिच्यावर दि. १४ मार्च २०२६ रोजी एका अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केला. या भीषण घटनेत संबंधित मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. या अल्पवयीन मुलीवरील ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ शहादा येथील स्वर्ण समाजाकडून प्रांत अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित गुन्हेगारास तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः मुलींच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा प्रकार मानवी संवेदनांना काळिमा फासणारा असून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा अत्यंत निंदनीय गुन्हा आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्यास अटक करावी, तसेच पीडित मुलीस योग्य न्याय मिळवून द्यावा, असे सुवर्णकार समाजाने निवेदनात म्‍हटले आहे.
निवेदन देताना कार्यकारी सदस्य मोहनलाल जगन्नाथ जगताप (खेडदिगर) व आनंदराव विष्णू विसपुते (शहादा) यांच्यासह मोहन सोनार, सोमेश्वर सोनार, अजय सोनार, संजूभाई सोनार, अमित सोनार, प्रितेश सोनार, निलेश सोनार आदी उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button