बिग ब्रेकिंग : नंदुरबारमध्ये ‘बॉम्बा’बोंब; पोस्ट, पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाने केली कसून तपासणी
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारचे पोस्ट कार्यालय आणि पासपोर्ट ऑफिस विषारी वायूयुक्त आरडीएक्सद्वारे उडवण्याच्या धमकी आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. यानंतर तातडीने बॉम्बशोधक व नाशक पथकाने तातडीने दोन्ही कार्यालये गाठून तेथील प्रत्येक कोपरा तपासून काढला. मात्र, शेवटी ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान, आता या मेलचा स्रोत आणि तो पाठविणारा कोण, याचा शोध घेतला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धमकी पोस्ट विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाला ई-मेलद्वारे प्राप्त झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ‘तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट व टपाल कार्यालयांमध्ये दुपारी १२.१० वाजता सायनाईड विषारीवायू मिश्रित १६ आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार आहे, सर्वांना तातडीने बाहेर काढा’, असा मजकूर या ई-मेलमध्ये होता. तसेच पार्सलद्वारे विषारी बॉम्ब पाठवण्यात आल्याची धमकीही मेलमध्ये नमूद करण्यात आली आहे.
हा मेल टपाल विभागाच्या धुळ्यातील वरिष्ठ अधीक्षकांनी तातडीने नंदुरबारच्या मुख्य टपाल कार्यालयाला १२ वाजून ५ मिनिटांनी फॉरवर्ड केला. यानंतर काही क्षणातच टपाल कार्यालयाने ही माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना कळवली. पोलिसांचे पथक तातडीने पोस्ट व पासपोर्ट कार्यालयात दाखल झाले. सोबत बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले.
या दोन्ही पथकांनी क्षणार्धात पोस्ट व पासपोर्ट कार्यालयांचा ताबा घेऊन सर्व कर्मचार्यांना बाहेर काढले. यानंतर दोन्ही कार्यालयांची कसून तपासणी करण्यात आली. सर्व संशयास्पद वस्तू कसून तपासण्यात आल्या. बर्याच वेळाच्या तपासणीनंतर अखेर बॉम्बसदृश वस्तू आढळली नाही. यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. या तपासणी काळात पोस्ट व पासपोर्ट कार्यालयाला पोलिसांनी वेढा घातला होता. तर भितीने सर्व कर्मचार्यांची पाचावर धारण बसली होती.
दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सद्यस्थितीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसून, तपास यंत्रणा प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे, असे कळवण्यात आले आहे.



