शहादा झाले श्रीराममय; भव्य दुचाकी रॅलीने वाढवला श्रीरामनवमीचा उत्साह; श्रीरामभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; घोषणांनी दणाणले शहर

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गुरुवारी (दि. २६) साजर्या होणार्या पावन श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला बुधवारी शहादा शहरात रामभक्तांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भव्य मोटरसायकल रॅली काढली. या रॅलीत युवकांसह विविध वयोगटातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत धार्मिक वातावरण निर्माण केले.
रॅलीची सुरुवात लोणखेडा बायपास येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून करण्यात आली. त्यानंतर प्रकाश रोड, गांधीनगर मार्गे रॅली महात्मा फुले चौक, बाबासाहेब आंबेडकर चौक, मुख्य रस्ता अशी शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत चावडी चौक येथे उत्साहात संपन्न झाली.
रॅलीदरम्यान जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषा आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे रॅली आकर्षणाचे केंद्र ठरली. नागरिकांनीही रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या रॅलीचे स्वागत केले.
आजच्या दुचाकी रॅलीमुळे शहरात धार्मिक एकात्मतेचा आणि उत्सवाचा आनंदमय माहोल निर्माण झाला होता. तसेच रॅलीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, उद्या श्रीरामनवमीच्या दिनीही बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे शहरात मोठी शोभायात्रा काढण्यात येणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.



