शहाद्यात उभारणार पाटीदार भवन, सरदार पटेलांचा पुतळा अन् कुलदैवत धाम; नगराध्यक्ष अभिजित पाटील यांचे आश्वासन

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : लेवा पाटीदार समाज बांधवांचा मदतीने शहादा शहरात लवकरच पाटीदार भवन कार्यालय, सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक, समाजाच्या कुलदेवतांसाठी सुसज्ज पाटीदार कुलदैवत धाम उभारण्यात येईल, असे आश्वासन शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी लेवा पाटीदार समाज बांधवांना दिले.
लेवा पाटीदार उन्नती मंडळातर्फे नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांची त्यांच्या मोहिदा रस्त्यावरील कार्यालयात समाज बांधवांनी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने लेवा पाटीदार समाजापुढील अडचणी, विविध प्रश्नांबाबत पुढाकार घेऊन चालना द्यावी, अशी विनंती करीत त्यांना तसे निवेदन देण्यात आले. त्यावेळी उपस्थित असंख्य समाज बांधवांसमोर पाटील यांनी समाजाच्या उन्नतीसाठी व भरभराटीसाठी लवकरच राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत समाज बांधवांना आश्वासित केले. यावेळी उन्नती मंडळातर्फे श्री पाटील यांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णकृती पुतळा व कुलदेवता तसेच प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. समाजातील प्रश्नांबाबत लोकेश पाटील (प्रकाशा), हर्षल पाटील (खेड), मनोज चौधरी (बामखेडा), हितेंद्र पाटील (शहादा), महेंद्र पाटील (तळवे), मुकेश पाटील (शहादा) आदींसह अन्य समाज बांधवांनी मनोगतातून समाजासमोरील विविध अडचणी, प्रश्न व समस्या मांडत त्या सोडवण्यासाठी पाटील यांना आवाहन केले. यावेळी शिरपूर, शहादा, खेतिया, नंदुरबार, तळोदा, निझर, वेळदासह परिसरातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाई पाटील यांनी केले.
समाजाच्या मागण्या
शहर आणि ग्रामीण लेवा पाटीदार समाज बांधवांमध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच समाजातील असंख्य गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या व्यवस्थेसाठी समन्वय यंत्रणा उभारणे, लेवा पाटीदार समाज परिसरातील १७० गावांमध्ये विखुरला असून, त्यांचे एकत्रित रजिस्टर करणे, समाजातील जेष्ठांसाठी आनंदाश्रम उभारणे, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हक्काचे उन्नती मंडळ उभारणे, परिसरातील व जगभरातील लेवा पाटीदार बांधवांसाठी सर्व कुलदेवतांचे पाटीदार धाम उभारणे, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भव्य स्मारक उभारणे, समाजातील जाज्वल्य इतिहासाचे जतन करण्यासोबतच भविष्यातील समाजाच्या पिढीला आधार देण्याचा दृष्टिकोनातून मागण्यांची पूर्तता करावी, अशी विनंती यावेळी लेवा पाटीदार उन्नती मंडळातर्फे करण्यात आली.
एकत्र येऊन विकास साधूया : पाटील
यावेळी पाटील यांनी सर्व मागण्या समजून घेत त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. समाजात मतभेद न होऊ देता समाजहिताचे काम करणार्यांना मदत करावी. ग्रामीण व शहरातील सर्व समाज बांधवांनी एकत्रित प्रगत सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी प्रयत्न करावा, समाज उन्नतीचे काम करताना राजकीय मतभेद बाजूला ठेवावेत, समाजाचे अध्यक्ष, पदाधिकार्यांच्या पदाचा मान सर्वांनी ठेवावा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी सर्व उपस्थितांना केले. दुर्बल घटक आर्थिक मंडळ, समाजाचे रजिस्ट्री, उन्नती मंडळ, आनंदाश्रम याही गोष्टी पूर्णत्वाकडे नेल्या जातील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
असे होतील कार्यक्रम
२४ एप्रिल : पाटीदार समाजाचे कार्यालय उद्घाटन.
३१ ऑक्टोबर २०२६ : पाटीदार धाम जागा निश्चिती तसेच सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाचे भूमिपूजन.



