सहा. प्रकल्प अधिकारी राऊतच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी, बड्या अधिकार्यांच्या समावेशाचीही शक्यता, सखोल चौकशीची गरज : पोलिस; न्यायालयाने सुनावली २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

तळोदा / छत्रपती संभाजीनगर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शासकीय वसतिगृहाच्या भोजन पुरवठा देयकात झालेल्या सुमारे २५ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेला तळोद्याच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास प्रकल्पातील सहायक अधिकारी उत्तम नागोजी राऊत याला न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. राऊत आणि त्याच्या सहकार्यांनी केलेल्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, या घोटाळ्यात मोठ्या अधिकार्यांच्या समावेशाची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशीची आवश्यकता असल्याचे सांगत पोलिसांनी न्यायालयाकडे त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत असताना शासकीय वसतिगृहाच्या भोजन पुरवठा देयकात केलेल्या घोटाळ्यात उत्तम राऊत याला मंगळवारी छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिकनगरचे पोलिस उपनिरीक्षक विनोद भालेराव व त्यांच्या सहकार्यांनी तळोदा येथून अटक केली होती. यानंतर पोलिसांनी राऊतला रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरला आणले. आज, बुधवारी (दि. २५) त्याला सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कर्हाळे व त्यांच्या सहकार्यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (क्र. ९) न्या. बी.डी. चोखट यांच्या न्यायालयासमोर हजर केले.
यावेळी पोलिसांनी राऊतच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाला केली. छत्रपती संभाजीनगर येथे गृहप्रमुख/ गृहपालपदी कार्यरत असताना राऊत आणि त्याच्या सहकार्यांनी केलेल्या घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी आहे. या सर्वांनी कट रचून गैरव्यवहार करण्यासाठी शासकीय वसतिगृहांच्या भोजन पुरवठा रजिस्टरमध्ये खाडाखोड केली आहे. विद्यार्थ्यांची बनावट हजेरीपत्रके तयार करून विद्यार्थ्यांची संख्या कृत्रिमरीत्या वाढवून दाखवली आणि त्याआधारे भोजन पुरवठ्याचे खोटे देयक सादर करून शासनाकडून निधी लाटला. या देयकांची रक्कम तब्बल ३८ लाख रुपयांच्या घरात आहे. या सार्यातून आरोपींच्या गैरव्यवहाराची मानसिकता दिसते. घोटाळ्यातील अन्य अधिकार्यांना अटक करणे बाकी असून, या घोटाळ्यात आणखी काही बड्या अधिकार्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींची सखोल तपासणी करणे आवश्यक असल्याने त्या अनुषंगाने तपासासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, असे पोलिसांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. यानंतर न्या. बी.डी. चोखट यांनी आरोपी उत्तम राऊत याला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.



