गुन्हे वार्ता

श्रीरामनवमीच्‍या पूर्वसंध्‍येला फोडले भक्‍ताचे मंदिर; नवापूरच्‍या रोकडिया हनुमान मंदिराच्‍या दानपेटीवर चोरट्यांचा डल्‍ला; रोकड लंपास, घटना सीसीटिव्‍हीत कैद

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : पावन श्रीराम नवमी उत्‍सवाचा जिल्‍हाभर उत्‍साह असतानाच चोरट्यांनी नवापुरातील श्रीराम भक्‍त हनुमानाच्‍या मंदिराला लक्ष्‍य करून मोठा डल्‍ला मारल्‍याची घटना उघडकीस आल्‍याने संताप व्‍यक्‍त होत आहे. शहराजवळील सुरत–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत वाकीपाडा गावाजवळ असलेल्या ग्रामदैवत रोकडिया हनुमान मंदिराचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश करत दानपेटी फोडून अंदाजे ३५ ते ४० हजार रुपयांची रक्कम लंपास केले. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिसानी दिलेल्‍या माहितीनुसार, बुधवारी (दि. २५) पहाटे सुमारे ४ वाजेच्‍या सुमारास चोरट्याने मंदिरात शिरकाव केला. त्यानंतर दानपेटी फोडून रोख रक्कम चोरून नेली. सकाळी ५ वाजता मंदिराची साफसफाई करण्यासाठी कर्मचारी आले असता कडी-कोंडे तुटलेले दिसून आले. त्यांनी तत्काळ मंदिर विश्वस्तांना याबाबत माहिती दिली.
विश्वस्तांनी घटनास्थळी पोहोचून मंदिर व परिसरात लावलेल्‍या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. यात चोरीची संपूर्ण घटना स्पष्टपणे कैद झाली होती. यानंतर नवापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत तपास सुरू केला आहे.
दरम्यान, ही घटना गजबजलेल्या सुरत–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत घडल्याने श्री हनुमान भक्‍तांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाकीपाडा, रेल्वे स्टेशन परिसर आणि हनुमान फळी भागातील नागरिकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.
मंदिर समितीने या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित चोरट्याला लवकरात लवकर अटक करून चोरीस गेलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दोन दिवसांत दुसरे मंदिर लक्ष्‍य
दोन दिवसांपूर्वी नंदुरबार शहरालगत असलेल्‍या वाघेश्‍वरी टेकडीवरील श्री वाघेश्‍वरी देवी मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली होती. त्‍यानंतर अवघ्‍या दोन दिवसांनी नवापुरात पुन्‍हा चोरट्यांनी जिल्‍ह्यातील आणखी एक मंदिर टार्गेट केल्‍याने भाविकांमध्‍ये संताप व्‍यक्‍त होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button