भोंदूगिरीला राजाश्रय, सामाजिक-प्रशासकीय पाठबळ धोकादायक; खरात प्रकरणात कठोर कारवाई करा; शहाद्यात ‘अंनिस’ची मागणी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि महिलांच्या शोषणाविरुद्ध राज्यस्तरावर कठोर कारवाई करण्याची मागणी शहादा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नाशिकमधील भोंदूगिरीचे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, समाजातील भीती, असुरक्षितता आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांसह सामान्य नागरिकांचे शोषण कशा पद्धतीने केले जाते, याचे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक उदाहरण आहे. तथाकथित अध्यात्म, ज्योतिष आणि दैवी शक्तीच्या नावाखाली आर्थिक, मानसिक तसेच लैंगिक शोषणाचे प्रकार घडत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे, असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने निवेदनात म्हटले आहे. समितीच्या पदाधिकार्यांनी हे निवेदन तहसीलदारांकडे सोपवले.
समितीने पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारची बुवाबाजी एका व्यक्तीच्या बळावर उभी राहत नाही. त्यामागे सामाजिक मान्यता, आर्थिक स्वार्थ तसेच काही वेळा राजकीय व प्रशासकीय पातळीवरील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संरक्षण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्यापक पातळीवर करून त्यामागील संपूर्ण जाळे उघड करणे अत्यावश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर समितीने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी. कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता दोषींवर कठोर कारवाई केली जावी, “महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, २०१३” या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून राज्यात सुरू असलेल्या अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला आळा घालावा, भोंदू अशोक खरातवर तत्काळ व कठोर कारवाई व्हावी, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबवावी, असेही समितीने निवेदनात नमूद केले आहे.
हे निवेदन देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, रवींद्र पाटील, प्रवीण सावळे, प्रवीण महिरे, हृदेशभाऊ चव्हाण, संतोष महाजन, भटू वाकडे, व्ही.एस. बोडरे, अनिल माळी, घनश्याम भाऊ, एन.डी. पाटील, वैशाली पाटील, सुमिता सावळे, अनिता माळी, भारती पवार, सविता बोडरे, प्रवीण वाघ, किरण खर्डे, महेंद्र भोसले, प्रदीप केदारे यांसह शहादा, कळंबू व आडगाव शाखेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



