मुख्य बातम्या

खरात झाले, आता मंत्री झिरवळ अडकले; अश्‍लील व्‍हीडिओ आला समोर; राजकीय गदारोळ सुरू, सपकाळ म्‍हणाले, मंत्रीपदावरून हकालपट्टी आवश्‍यक

मुंबई (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नाशिकमधील भोंदूबाबा याच्‍या अश्‍लील करामतींच्‍या क्‍लिप्‍सने राज्‍यभर गोंधळ घातलेला असतानाच आता थेट राज्‍याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री यांचा कथित अश्‍लील व्‍हीडिओ समोर आल्‍याने खळबळ उडाली आहे. झिरवळ आणि एक तृतीयपंथी व्‍यक्‍ती एकाच बेडवर आक्षेपार्ह अवस्‍थेत असल्‍याच्‍या व्‍हीडिओने राजकीय गदारोळ सुरू झाला असून, काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवळ यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी केली आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या व्‍हीडिओमध्‍ये मंत्री झिरवळ यांच्‍यासोबत दिसणारी व्‍यक्‍ती तृतीयपंथी पवन यादव असून, त्‍याचा भाऊ रवी यादव यानेच हा व्‍हीडिओ सार्वजनिक केल्‍याचे बोलले जात आहे. दरम्‍यान, पवन यादवशी संबंधित प्रकरणात आणखी काही मंत्र्यांची नावे समोर येण्‍याची समोर येण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात असून, त्‍यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्‍याप्‍ती वाढण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. सोबतच हे दोघे मंत्र्यांच्‍या शासकीय निवासस्‍थानातील खोलीत आक्षेपार्ह अवस्‍थेत सापडल्‍याचे सांगण्‍यात येत असून, त्‍यामुळे शासकीय निवासस्‍थानांच्‍या दुरूपयोगाचा मुद्दाही समोर आला आहे. या व्‍हीडिओच्‍या सत्‍यतेची पडताळणी मात्र होऊ शकलेली नाही. दुसरीकडे, या कथित अश्‍लील व्‍हीडिओच्‍या अनुषंगाने अद्याप झिरवळ यांच्‍याकडून किंवा त्‍यांच्‍या पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्‍यात आलेली नाही. तर मंत्री झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्‍हीडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल होणे ही केवळ घटना नव्‍हे तर राज्‍याच्‍या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्‍वलंत उदाहरण असल्‍याची टीका करीत काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे झिरवळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्‍याची मागणी केली आहे.
राष्‍ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याची अश्‍लील कृत्‍ये उघडकीस आल्‍यानंतर त्‍याच्‍याशी संबंध असलेल्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या नेत्‍या आणि राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रुपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्‍यानंतर आता पुन्‍हा याच पक्षाचे नेते आणि मंत्री असलेले नरहरी झिरवळ तृतीयपंथीसोबतचा अश्‍लील व्‍हीडिओ समोर आल्‍याने चर्चेला उधाण आले आहे. याआधी झिरवळ यांच्‍या मंत्रालयातील कार्यालयात एका अधिकार्‍याने ५० हजारांची लाच घेतल्‍याचे उघडकीस आल्‍याने ते वादाच्‍या भोवर्‍यात अडकले होते. दुसरीकडे, याआधी मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि रुपाली चाकणकर या राष्‍ट्रवादीच्‍या तीन नेत्‍यांना विविध कारणांमुळे पदांवर पाणी सोडावे लागले होते. आता त्‍याच पक्षाचे झिरवळ देखील अश्‍लील व्‍हीडिओमुळे अडचणीत आल्‍याने सध्‍या राष्‍ट्रवादी पक्षाच्‍या मागे शुक्‍लकाष्‍ठ लागल्‍याची चर्चा सुरू झाली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button