नंदुरबार जिल्हा

शहादा तालुक्‍यात हृदयद्रावक अपघात : भरधाव आयशरने तिघांना चिरडले; जागीच मृत्‍यू, एक किरकोळ जखमी, धडगावच्‍या पाटली गावावर शोककळा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : दुचाकी घसरून भरधाव आयशर मालवाहू वाहनाच्‍या चाकाखाली येऊन चारपैकी तिघांचा जागीच मृत्‍यू झाल्‍याची हृदयद्रावक घटना शहादा तालुक्‍यात घडली. अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर रस्‍त्‍यावरील कोठली ते वडाळीदरम्‍यान घडलेल्‍या या भीषण अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला असून, हे तिघेही धडगाव तालुक्‍यातील पाटली गावचे रहिवाशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, धडगाव तालुक्‍यातील पाटली येथील इश्‍वरसिंग कांतिलाल वळवी, गोवाल अशोक वळवी, दीपक फुगा पाडवी आणि मेहेरसिंग कांतिलाल वळवी हे चौघे एकाच दुचाकीवरून बुधवारी (दि. २५) पाटली येथून तोरखेडा येथे नातेवाईकांना भेटण्‍यासाठी आले होते. परत गावाकडे निघाल्‍यानंतर सायंकाळी सहा वाजेच्‍या दरम्‍यान कोठली गावाजवळ वेगात जात असताना शहाद्याकडून शिरपूरकडे जाणारे एक आयशर वाहन भरधाव वेगाने त्‍यांच्‍या बाजूने पास होत होते. यावेळी दुचाकीचालक मेहेरसिंग याचा दुचाकीवरील ताबा सुटला. यामुळे दुचाकीवरील चौघेही रस्‍त्‍यावर पडले आणि यातच मेहेरसिंग वगळता अन्‍य तिघेही आयशरच्‍या चाकाखाली सापडले. यात इश्‍वरसिंग कांतिलाल वळवी (१८), दीपक उर्फ डुंगा पाडवी (१४) आणि गोवाल अशोक वळवी (१५) हे तिघेही आयशरच्‍या चाकाखाली चिरडले गेले आणि जागीच त्‍यांचा मृत्‍यू झाला. तर मेहेरसिंग वळवी या भीषण अपघातातून बचावत किरकोळ जखमी झाला. त्‍यांची गाडीही बाजूला फेकली गेल्‍याने तिचे फारसे नुकसान झाले नाही. इश्‍वरसिंग हा मेहेरसिंग याचा सख्‍खा भाऊ तर दीपक व गोवाल हे मामेभाऊ असल्‍याचे सांगण्‍यात आले.
घटनेची माहिती मिळताच सारंगखेडाचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, उपनिरीक्षक किरण बारे, अन्‍य पोलिस कर्मचारी, तसेच पोलिस पाटील सुखदेव पाटील, सरपंच राहुल पाटील, उपसरपंच डॉ. उमेश पाटील, दीपक पाटील आदींनी जखमीला तत्‍काळ उपचारासाठी रुग्‍णालयात हलविले. तर ठार झालेल्‍या तिघांचे मृतदेह शहादा ग्रामीण रुग्‍णालयात शवविच्‍छेदनासाठी रवाना करण्‍यात आले.
अपघातानंतर घटनास्‍थळ परिसरात सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी ग्रामस्‍थांच्‍या मदतीने ही वाहतूक सुरळित केली. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बारे करीत आहेत.
सुरक्षिततेकडे दुर्लक्षाने अपघातांची मालिका
या अपघातानंतर रस्ते सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालविणे, हेल्मेटचा अभाव, तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याची चर्चा सुरू आहे. या दुर्घटनेनंतर वडाळी–कोठळी मार्गावर वेगमर्यादा नियंत्रण, चेतावणी फलक, तसेच नियमित पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button