नंदुरबार जिल्हा

कोवळे हात पिवळे करण्‍याची सुरू होती तयारी; चाईल्‍ड हेल्‍पलाईनला ‘टीप’ मिळाली अन्‌ अनर्थ टळला; धडगावच्‍या तलईत रोखला बालविवाह

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : धडगाव तालुक्‍यातील तलई येथे होऊ घातलेला एक बालविवाह रोखण्‍यात स्‍थानिक ग्रामस्‍थांच्‍या मदतीने रोखण्‍यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले. चाईल्‍ड हेल्‍पलाईनच्‍या १०९८ क्रमांकावर आलेल्‍या एका निनावी दुरध्‍वनीनंतर ही कार्यवाही करण्‍यात आली असून, चाईल्‍ड हेल्‍पलाईनच्‍या समन्‍वयकांसह ग्रामस्‍थांनी समजूत घातल्‍यानंतर सदर अल्‍पवयीन मुलीने वयाची १८ वर्षे आणि शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्‍याचा निर्णय जाहीर केला आणि सर्वांच्‍याच चेहर्‍यावर हसू फुलले.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तलई (ता. धडगाव) येथे एका अल्‍पवयीन मुलीच्‍या विवाहाची तयारी सुरू असल्‍याचा निनावी कॉल २० मार्च रोजी पुण्‍यातील बालविकास आयुक्‍तालयाच्‍या चाईल्‍ड हेल्‍पलाईनच्‍या १०९८ या क्रमांकावर आला होता. तेथील अधिकार्‍यांनी तातडीने ही माहिती या प्रकल्‍पाच्‍या नंदुरबार येथील जिल्‍हा समन्‍वयक सपना नगराळे यांच्‍या कानावर घालून या प्रकरणात लक्ष घालण्‍यास सांगितले.
नगराळे यांनी तत्‍काळ प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तलईचे सरपंच गोवाली वसावे आणि ग्रामसेवक जान्‍या पाडवी यांच्‍याशी संपर्क साधला. या दोघांनीही तातडीने अंगणवाडी सेविका वैशाली वसावे, गंगा वसावे, विमा वसावे आणि आशासेविका शर्मिला गोविंद वसावे यांना घेऊन सदर अल्‍पवयीन मुलीचे घर गाठले. तेथे तिच्‍या कुटुंबियांशी संवाद साधून त्‍यांना कमी वयात मुलीचे लग्न लावून दिल्‍यास तिच्‍यावर होणारे शारीरिक व मानसिक परिणाम याची दुष्परिणाम लक्षात आणून देण्‍यात आले.
तसेच मुलीचीही समजूत घालत तिचे मनपरिवर्तन करण्‍यात यश मिळविले. यानंतर त्‍या मुलीने वयाची १८ वर्षे व शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्नाच्‍या बोहल्‍यावर चढणार नाही, असा ठाम निर्णय जाहीर केला. मुलीच्‍या या निर्णयाने तिच्‍या पालकांच्‍या चेहर्‍यावर आनंदाची लहर चमकली. शिवाय एका निनावी फोनमुळे एका कोवळ्‍या वयातील मुलीचा विवाह रोखण्‍यात यश आल्‍याने प्रशासनाच्‍या कार्यवाहीचेही कौतुक झाले.
दरम्‍यान, बालविवाह हा कायद्याने गुन्‍हा असून, असा प्रकार घडत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास तत्‍काळ १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून कोवळ्‍या वयातील मुला-मुलींचे आयुष्‍य उद्‍ध्‍वस्‍त होण्‍यापासून वाचवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button