तुम्ही लाईटबिल भरले का ? : थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणकडून काटाकाटी सुरू; नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार जणांची बत्ती गुल

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वीजेचा वापर करून बिल न भरणार्यांच्या विरोधात महावितरणने कडक भूमिका घेत थेट वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर बिलांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीने अधिकच कडक धोरण अवलंबिले असून, गेल्या महिनाभरात नंदुरबार परिमंडलात तब्बल सुमारे १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
महावितरणमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे वीजबिलापोटी मोठ्या प्रमाणात रक्कम थकली आहे. महावितरणच्या नरमाईच्या धोरणामुळे थकबाकीचे हे प्रमाण वाढतच चालले असून, या पार्श्वभूमीवर मार्च अखेरीसाठी वसुलीचे धोरण निश्चित करून आता महावितरण कंपनीने या अनुषंगाने कडक पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.
मार्च अखेर असल्याने महावितरणने थकबाकीच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करणे, पुरवठा खंडित केलेल्या वीज जोडण्यांची तपासणी अशी मोहीम हाती घेतली आहे. महिनाभराचे बिल थकले असले तरी बिलाची रक्कम किती आहे, हे न पाहता नियमानुसार थेट वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. याच अंतर्गत गेल्या महिनाभरात ११ हजार ९७६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला गेला आहे. एवढेच नव्हे तर थकबाकीदार पुरवठा खंडित झाल्यानंतर शेजार्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वीज घेत पुरवठा पूर्ववत केल्याचे आढळल्यास दोघांविरोधातही कायदेशीर कारवाई देखील केली जात आहे.
अर्थात, असे असले तरी अजूनही नंदुरबार मंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे तब्बल ९ कोटी ७० लाख रुपये वीजबिलापोटी थकले आहेत. मार्च अखेरपर्यंत या ग्राहकांनी बिलाची रक्कम न भरल्यास त्यांच्याविरोधात पुरवठा खंडित करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा महावितरणने दिला आहे.



