तळोद्याच्या गणेश बुधावलमध्ये किरकोळ कारणावरून खून; गाडी न विचारता घेऊन गेल्याच्या रागातून डोके भिंतीवर आपटले; आरोपीला बेड्या
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : परवानगी न घेता गाडी घेऊन गेल्याच्या रागातून २२ वर्षीय तरुणाचा भिंतीवर डोके आपटून खून करण्यात आल्याची घटना तळोदा तालुक्यात उघडकीस आली आहे. रवींद्र पुष्पेंद्र वळवी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी गावातीलच अनिल भामट्या पाडवी (३५) या मजुराला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २४) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास ही गणेश बुधावल गावात ही घटना घडली. रवींद्र वळवी हा काही कामानिमित्त अनिलची दुचारी घेऊन गेला होता. याचा राग अनिलच्या मनात होता. मंगळवारी संध्याकाळच्या वेळी घराच्या समोरील खोलीत झोपलेला असताना अनिल त्या ठिकाणी आला. त्याने रवींद्रला माझी गाडी तू कुणाला विचारून व कशासाठी घेऊन गेला होता, असा जाब विचारीत त्याच्याशी वाद घातला. हा वाद वाढल्यानंतर अनिलने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. नंतर गळा दाबून त्याला गचांडी धरून घराबाहेर आणले. तेथेही मारहाण करीत रवींद्रचे डोके समोरच घर असलेल्या मनोहर विरसिंग पाडवी यांच्या घराच्या भिंतीवर आपटले.
यात डोक्याला गंभीर जखमी झालेल्या रवींद्रला नातेवाईकांनी तातडीने तळोदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. तेथे उपचार सुरू असताना बुधवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रवींद्रचे वडिल पुष्पेंद्र कुणाल वळवी (४९) यांनी अनिल पाडवी याच्याविरोधात खुनाची तक्रार नोंदवली. त्यानुसार तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. त्याने खुनाची कबुली दिली असून, त्याला लगेच न्यायालयसमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने २९ मार्चपर्यंत त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. पोलिस निरीक्षक राजन मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



