मतदार मॅपिंग करून घ्या, अन्यथा वाढतील अडचणी; शहाद्यात मोहिमेला वेग; २८ मार्चला विशेष शिबिर

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरात मतदार मॅपिंग मोहिमेने वेग धरला असून, शहरवासीयांना मतदार मॅपिंग करणे सोपे जावे यासाठी नगर पोलिकेच्या वतीने २८ मार्च रोजी विशेष शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या मोहिमेंतर्गत मतदार मॅपिंग न करणार्या मतदारांना भविष्यात अधिक कडक तपासणी प्रक्रियेला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साजिद पिंजारी यांनी शहरातील सर्व नागरिकांना महत्त्वाचे आवाहन करत एसआयआर अंतर्गत सुरू असलेल्या मतदार मॅपिंग प्रक्रियेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. २००२ सालच्या मतदार यादीतील मतदारांचे मॅपिंग सध्या बीएलओमार्फत सुरू असून, ज्यांचे मॅपिंग अद्याप पूर्ण झालेले नाही त्यांनी तात्काळ आपल्या भागातील बीएलओशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेत सहभागी न झालेल्या नागरिकांना पुढील काळात अधिक तपासणी प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते. मतदारांची अडचण दूर व्हावी, या हेतूने शहादा नगरपालिकेच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवारी (दि. २८) सकाळी १० वाजता लोकमान्य टिळक टाऊन हॉल, जुना प्रकाश रोड येथे पार पडेल. या शिबिरात नागरिकांना मॅपिंग प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असेही प्रशासनाने नमूद केले आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी ही मॅपिंग मोहीम महत्त्वाची ठरत असल्याचे पिंजारी यांनी म्हटले आहे.



