नंदुरबार जिल्हा

बिग ब्रेकिंग : हायटेन्‍शन टॉवरवर चढला मनोरूग्‍ण; प्रशासनाला टेन्‍शन, नंदुरबारच्‍या पळाशीतील थरार; २४ तासांपासून उतरेना

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार तालुक्यातील पळाशी गावात धक्कादायक आणि तितकाच धोकादायक प्रकार समोर आला आहे. विद्युत विभागाच्या हायटेन्‍शन टॉवरवर एक इसम चढल्याने परिसरात खळबळ उडाली असून, गेल्या २४ तासांपासून त्याला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तो व्‍यक्‍ती खाली उतरण्‍यास तयार नसल्‍याने प्रशासनाचे टेन्‍शन वाढले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टॉवरवर चढलेल्‍या या व्‍यक्‍तीचे नाव काळू ठाकूर असून, तो मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे समजते. तो धुळे जिल्ह्यातील सोनगीर ते गुजरात राज्यातील नेत्रंग या दरम्यान असलेल्या ७६५ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीजवाहिनीच्या टॉवर क्रमांक १९० वर चढला आहे.
विशेष म्हणजे, हा टॉवर अत्यंत उच्चदाबाच्या वीजप्रवाहाशी जोडलेला असल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे. तरीही काळू ठाकूर टॉवरवरच ठाण मांडून बसला असून, खाली उतरण्यास नकार देत आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर (मनोरुग्ण) असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, तो टॉवरवर का चढला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, तसेच विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सकाळपासून त्याला समजावून सांगण्याचे, विविध मार्गांनी खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्यात यश आलेले नाही.
दरम्यान, वीजप्रवाह सुरू असतानाच तो टॉवरवर चढल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन अत्यंत दक्षतेने आणि संयमाने परिस्थिती हाताळत असून, नागरिकांनाही घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण पळाशी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित इसमाला सुखरूप खाली उतरवण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button