महिलांनी भरलेली रिक्षा उलटली; एकीचा मृत्यू, चालकासह चार महिला गंभीर जखमी; नंदुरबारच्या उमर्दे-वडवद रस्त्यावर भीषण दुर्घटना
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मजूर महिलांनी भरलेली रिक्षा उलटून एक महिला जागीच ठार तर रिक्षाचालकासह आणखी चार महिला गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना नंदुरबार तालुक्यातील उमर्दे-वडवद रस्त्यावर घडली. हे सर्व जण नंदुरबार तालुक्यातील पातोंडा गावातील रहिवाशी असून, सगळ्या महिला मजुरी कामासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताला जबाबदार धरून रिक्षाचालकाविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक प्रवीण देविसिंग भिल (२५, रा. पातोंडा, ता. व जि. नंदुरबार) हा पाच महिलांना त्याच्या ॲपे रिक्षात (क्र. एमएच ३९ डी १४९०) बसवून मजुरीसाठी घेऊन चालला होता. उमर्दे – वदवद रस्त्याने जात असताना बुधवारी (दि. २५) सकाळी ८ वाजेच्या सुमारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही रिक्षा उलटली. यानंतर रिक्षाने तीन ते चार पलट्या खाल्ल्या.
यामुळे रिक्षात बसलेल्या निर्मलाबाई बन्सी भिल (५४), रेखाबाई कर्मा भिल (५०), लिलाबाई सुनील ठाकरे (३५), मंगला पुंजू भिल (२४), राजबाई विनेश भिल (२०) आणि चालक प्रवीण भिल (२५) हे सगळेच रस्त्यावर फेकले गेले. तसेच रिक्षाचेही मोठे नुकसान झाले. यात निर्मलाबाई भिल यांना डोक्याला व छातीला जोरदार मार लागल्याने त्या जबर जखमी झाल्या होत्या. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी सर्व जखमींना नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे सध्या पाचही जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बेदरकारपणे रिक्षा चालवून स्वत:सह प्रवाशांच्या दुखापतीस आणि एका प्रवासी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालक प्रवीण भिल याच्याविरोधात मिस्रीकाम करणार्या आणा तारसिंग पाडवी यांनी फिर्याद दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक धनराज जाधव करीत आहेत.



