कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने शेतकर्याला ८० हजारांचा गंडा; तीन वर्षे नुसतेच घुमवले, नवापूर तालुक्यातील थापाड्यावर नंदुरबारमध्ये गुन्हा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मालवाहू आयशर ट्रक घेण्यासाठी श्रीराम फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळण्यास मदत करण्याचे आमिष दाखवून नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथील एका शेतकर्याला नवापूर तालुक्यातील एकाने तब्बल ८० हजार रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे मिळाल्यानंतर हा थापाड्या तब्बल तीन वर्षे या शेतकर्याला निव्वळ आश्वासने देत फिरवत राहिला. अखेर शेतकर्याच्या तक्रारीवरून विक्रम जगन्नाथ पेंढारकर याच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथील मेरुलाल वेडू पाडवी (४७) या शेतकर्याला मार्च २०२३ मध्ये मालवाहू आयशर वाहनाची खरेदी करायची होती. त्यासाठी त्यांनी काही पैशांची तरतूदही केली होती. तर काही रकमेचे कर्ज काढून वाहन खरेदी करायचे असे ठरवले होते. याच दरम्यान त्यांची नवापूर तालुक्यातील वाटवी येथील विक्रम जगन्नाथ पेंढारकर याच्याशी ओळख झाली. पेंढारकर याने पाडवी यांना श्रीराम फायनान्स कंपनीतील अधिकार्यांशी आपली चांगली ओळख असून, आपण या कंपनीतून आयशर घेण्यासाठी कर्ज मिळवून देण्यास मदत करू, अशी थाप पाडवी यांना मारली.
पाडवी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून २३ मार्च २०२३ रोजी पेंढारकर याला वाघाळे येथे १० हजार रुपये रोख दिले. तर नंदुरबार बसस्थानकाजवळ ९८८१३५०९२८ या मोबाईल क्रमांकावर यूपीआयच्या माध्यमातून ७० हजार रुपये ट्रान्स्फर केले. यानंतर पाडवी यांनी वेळोवेळी त्याला कर्जप्रकरण पूर्ण करून देण्याची आठवण केली. मात्र, तो पाडवी यांना फिरवत राहिला. पुढे पेंढारकर याने पैसे देता येत नसल्याने आपली गाडी पाडवी यांच्या नावावर करून देण्याचे आश्वासन दिले. पण पुढे त्याने ही दोन्ही आश्वासने पूर्ण केली नाहीत.
आज ना उद्या पैसे परत मिळतील, या आशेने पाडवी पेंढारकरच्या मागे फिरत होते. मात्र, तो फक्त टोलवाटोलवी करीत असल्याचे लक्षात आल्यावर अखेर त्यांनी २५ मार्च २०२६ रोजी नंदुरबार तालुका पोलिस ठाणे गाठून विक्रम पेंढारकर याच्याविरोधात फिर्याद नोंदवली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३९८ (४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस हेडकॉन्स्टेबल अशोक बहिरम या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



