शहाद्यात गुंजले एकच नाम…जय श्रीराम; श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा; भव्य शोभायात्रेत हजारो भाविकांचा सहभाग

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरात गुरुवारी (दि. २६) श्रीराम जन्मोत्सवानिमित्त धार्मिक उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. हुतात्मा लालदास चौकातील श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान मंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती पार पडली. यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहून दर्शन घेतले.
या आरतीप्रसंगी आमदार राजेश पाडवी, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे चेअरमन दीपक पाटील, शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष माधवी पाटील, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, श्याम जाधव, अजय शर्मा, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
रामनवमीच्या निमित्ताने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हुतात्मा लालदास चौकातून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत विविध आकर्षक देखावे सादर करण्यात आले. सुरुवातीला रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा सादर करण्यात आला. त्यानंतर श्री हनुमान व महादेव यांच्या भव्य मूर्तींचा देखावा आणि २१ फूट उंचीची श्रीरामांची आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी युवकांनी पारंपरिक वेशभूषेत सशस्त्र प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. शहरातील विविध शाळा व सामाजिक संस्थांनीही शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला सातपुडा शिक्षण विद्या प्रसारक मंडळ धुळे संचलित शाळेचे विभागीय सचिव प्रा. संजय जाधव, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, ललित छाजेड, कल्पेश पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोतीलाल जैन, भूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, राकेश पाटील, डॉ. चंद्रभान कदम, भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद सोनार, वसंत पाटील, डॉ. वसंत पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहादा संघचालक डॉ. हेमंत सोनी, जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती हेमलता शितोळे पाटील, प्राचार्य कल्पना पाटील, भगवानदास अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण शहरात रामनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला. शोभायात्रेने शहरातील विविध मार्गांवरून फेरफटका मारत नागरिकांना धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला. एकंदरीत श्रीरामनवमी निमित्ताने शहादा शहरात भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचे सुंदर दर्शन घडले.



