मुख्य बातम्या

नंदुरबार जिल्‍हा पोलिस प्रमुखांची धडक कारवाई : बिरसा टायगर्सच्‍या प्रमुखासह ९ जणांची टोळी जिल्‍ह्यातून हद्दपार; दंगल भडकावण्‍यासह शासकीय आदेशांच्‍या उल्‍लंघनाचा ठपका

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍हा पोलिसांच्‍या बदनामीचे वृत्त पसरविल्‍याने रडारवर आलेला बिरसा फायटर्स संघटनेचा राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सुशीलकुमार पावरा याच्‍यासह ९ जणांच्‍या टोळीवर जिल्‍हा पोलिस प्रमुख श्रवण दत्त एस. यांनी अखेर कारवाईचा आसूड उगारला आहे. पावरासह या सर्व ९ जणांना दोन वर्षांसाठी नंदुरबार जिल्‍ह्यातून हद्दपार करण्‍यात आले असून, तसे आदेश रात्री उशीरा जारी करण्‍यात आले. या सगळ्‍यांवर दंगल भडकावण्‍यासह शासकीय आदेशांच्‍या उल्‍लंघनाचा ठपका ठेवण्‍यात आला आहे.
नंदुरबार जिल्‍ह्यात कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राखण्‍यासह गुन्‍हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्‍यासाठी जिल्‍हा पोलिस प्रशासनाकडून सातत्‍याने कठोर कारवाई करण्‍यात येत आहे. याच अनुषंगाने शहादा पोलिस ठाण्‍याच्‍या अंतर्गत कार्यरत ९ जणांच्‍या टोळविरूद्ध मोठी कारवाई करण्‍यात आली आहे. संबंधित टोळीच्‍या सदस्‍यांच्‍या गुन्‍हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेऊन जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी महाराष्‍ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्‍या कलम ५५ अन्‍वये या सर्व ९ जणांना दोन वर्षांसाठी नंदुरबार जिल्‍ह्यातून हद्दपार केल्‍याचे जिल्‍हा पोलिस दलाने म्‍हटले आहे. या कालावधीत या सर्वांना जिल्‍ह्यात प्रवेशासाठी मनाई राहणार आहे.
ही आहेत नावे
टोळीप्रमुख आणि बिरसा टायगर्स संघटनेचा राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सुशीलकुमार जहांगीर पावरा (४०, रा. होळ उंटावद, ता. शहादा, जि. नंदुरबार), रोहिदास गेमजी वळवी (६०, लोय पिंपळोद, ता. व जि. नंदुरबार), ॲड. राहुल श्रीराम कुवर (३९, रा. तिसी, ता. व जि. नंदुरबार), रवींद्र रंजित वळवी (५२, रा. दुधाळे शिवार, ता. व जि. नंदुरबार), पंकज राजेंद्र वळवी (३१. रा. जुना बैल बाजार, ता. व जि. नंदुरबार), गोपाल रमेश भंडारी (३४, रा. शहाणा, ता. शहादा, जि. नंदुरबार), अजय मधू वळवी (३३, रा. टोकरतलाव, ता. व जि. नंदुरबार), दिलीप मधू मुसळदे (३२, रा. टुकी, ता. शहादा, जि. नंदुरबार) आणि सतीश पांडुरंग ठाकरे (४०, रा. फत्तेपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार) अशी जिल्‍ह्यातून हद्दपार करण्‍यात आलेल्‍या टोळीच्‍या सदस्‍यांची नावे आहेत.
हे आहेत आरोप
या टोळीवर शहादा पोलिस ठाण्‍यासह इतर सार्वजनिक ठिकाणी टोळी जमवून मारामारी करणे, धमकी देणे, शासकीय कामात अडथळा, सार्वजनिक शांततेस बाधा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या आदेशाचे पालन न करणे अशा गंभीर गुन्‍ह्यांची नोंद आहे. हे सर्व जण संघटित टोळीच्‍या स्‍वरूपात कार्यरत राहून स्‍थानिकांमध्‍ये दहशत निर्माण करीत होती. या टोळीने केलेल्‍या कृत्‍यामुळे नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीत दंगल होऊन गंभीर परिस्‍थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी गुन्‍हाही दाखल झाला होता. या टोळीच्‍या प्रमुखांसह सदस्‍यांनी पसरविलेल्‍या अफवा व चिथावणीमुळे अनेक आदिवासी तरुणांवर गुन्‍हे दाखल झाले असून, आदिवासी व बिगर आदिवासी असा वाद निर्माण करून ही टोळी सामाजिक एकतेला बाधा आणत होती, असे आरोप या टोळीवर ठेवण्‍यात आले आहेत. दरम्‍यान, टोळीप्रमुख सुशीलकुमार पावरा याच्‍याविरोधात रत्‍नागिरी येथे दोन शाळकरी मुलींच्‍या विनयभंग केल्‍याप्रकरणी पोस्‍को कायद्यांतर्गत गुन्‍हाही दाखल झालेला आहे, अशी माहिती जिल्‍हा पोलिस दलाच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या प्रसिद्धी पत्रकात म्‍हटले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button