नंदुरबार जिल्हा

शेतकरी नडला, बिबट्याला भिडला; प्रसंगावधान, धैर्य अन्‌ शौर्य दाखवत हल्‍ला परतावून लावून वाचवले स्‍वत:चे प्राण; नवापूरच्‍या कन्‍हाळ्‍यात रंगला थरार

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्‍याच्‍या कन्‍हाळा शिवारात नरभक्षक बिबट्या आणि धैर्यशील व शुरवीर शेतकर्‍याच्‍या थरारक झुंज झाल्‍याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्‍हणजे या घटनेत शेतकर्‍याने प्रसंगावधान राखून या बिबट्याच्‍या हल्‍ला परतावून लावत त्‍याला परत फिरायला भाग पाडले. या घटनेत संबंधित शेतकरी जखमी झाला असून, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दानियल दिवाणजी गावित यांचे कन्‍हाळा शिवारात शेत असून, गुरुवारी सकाळी ८ वाजेच्‍या सुमारास ते या शेतात मका पिकाला पाणी देण्‍यासाठी मोटार चालू करण्‍यासाठी गेले होते. याचवेळी याच शेतात दबा भरून बसलेल्‍या बिबट्याने त्‍यांच्‍यावर झडप घातली. अचानक हा हल्‍ला होऊनही गावित यांनी न घाबरता धैर्याने या परिस्‍थितीचा सामना केला. प्रसंगावधान आणि धैर्य दाखवत गावित यांनी बिबट्याचा प्रतिकार केला.
या झुंजीत बिबट्या चवताळून गावित यांच्‍यावर हल्‍ला करीत होता. मात्र, ते प्रत्‍येक वार परतावून लावत होते. या दरम्‍यान बिबट्याने गावित यांच्‍या हातावर पंजाने वार केला. यात ते जबर जखमी झाले. मात्र, या परिस्‍थितीतही गावित यांनी झुंज सुरूच ठेवली. यावेळी आणखी एक बिबट्या त्‍या ठिकाणी होता, असे गावित यांनी नंतर सांगितले. याच काळात गावित यांनी जोरदार आरडाओरड सुरू केली. यामुळे बिबट्यांनी तेथून पळ काढला. या घटनेत दानियल गावित यांचा जीव वाचला तरी त्‍यांच्‍या हाताला जखम झाली आहे.
गावित यांची आरडाओरड ऐकूण आसपासच्‍या शेतातील शेतकरी आणि काही ग्रामस्‍थ त्‍यांच्‍या मदतीला धावून आले. या सर्वांनी जखमी अवस्‍थेतील गावित यांना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्‍णालयात उपचारसाठी दाखल केले. तेथे त्‍यांच्‍यावर प्राथमिक उपचार करण्‍यात आले.
दरम्‍यान, या घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर चिंचपाडा वनपरिक्षेत्र अधिकारी प्राशा पगार, वनरक्षक रामदास पावरा, अमोल गावित, अनिल वळवी, वनमजूर बाळा गावित आदींनी कन्‍हाळाकडे धाव घेत घटनास्‍थळाची पाहणी केली.
दरम्‍यान, कन्‍हाळा व परिसरात गेल्‍या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर असून, ग्रामस्‍थ व शेतकर्‍यांमध्‍ये दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्यांच्‍या बंदोबस्‍तासाठी परिसरात पिंजरे लावण्‍याची मागणी वाढत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button