नंदुरबार जिल्हा

काळ आला होता, पण… : केळीने भरलेले वाहन उलटले, दैव बलवत्तर असल्‍याने वाचला ८ मजुरांचा जीव; काहींची प्रकृती चिंताजनक, तळोदा तालुक्‍यात भीषण दुर्घटना

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : तालुक्यातील दसवड येथे केळीची वाहतूक करणारे वाहन पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी उलटल्यानंतर मजुरांमध्ये एकच आक्रोश पाहायला मिळाला. सर्व जखमी हे रोझवा येथील रहिवासी असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, केळी भरून जाणारे वाहन दसवड परिसरातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते अचानक पलटी झाले. या वाहनात केळीसोबतच मजूरही प्रवास करत होते. गाडी उलटल्याने मजूर केळीच्या घडांखाली आणि वाहनाखाली दबले गेले. स्थानिक रहिवाशांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढले.
शिवाजी राघव पाडवी (३५), दशरथ नोरा पावरा (३०), महेश भरत पावरा (१८), प्रिया सुभाष पावरा (१८) गोरमी मोना पावरा (२०), सुरमिंग राण्या वसावे (२०), मास एजाज बागवान (१९), रवींद्र बामण्या पावरा (२५) अशी या अपघातात गंभीर जखमी झालेल्‍या तरुण मजुरांची नावे आहेत.
​अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिका आणि खासगी वाहनांच्या मदतीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्राथमिक उपचार केल्यानंतर काही मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील तसेच अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, मालवाहू वाहनातून मजुरांची वाहतूक करणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे वाहनचालकांनी आणि मजुरांनी प्रवासादरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button