नंदुरबार जिल्हा

शहाद्यात गणरायानंतर प्रकटले महादेव, हनुमान अन्‌ शनि महाराज; खोल गल्लीतील खोदकामात साडपल्‍या प्राचीन मूर्ती, दर्शनासाठी उसळली गर्दी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील खोल गल्ली परिसरात श्री मारुती मंदिराच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान प्राचीन मूर्तींचा अनपेक्षित शोध लागल्याने परिसरात आश्‍चर्य व्‍यक्‍त होत आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या मूर्तींच्‍या दर्शनासाठी घटनास्थळी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, खोलगल्‍ली भागातील मंदिराच्‍या बांधकामासाठी खोदकाम सुरू असून, या खोदकामाच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणपती बाप्पा यांची प्राचीन, यादवकालीन मानली जाणारी मूर्ती आढळून आली होती. तिच्या शिल्पकलेवरून ती ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर खोदकाम पुढे सुरू ठेवले असता आता त्‍याच ठिकाणी महादेवाची पिंड, तसेच हनुमान आणि शनी महाराज यांच्या मूर्ती सापडल्या.
या सर्व मूर्ती आढळताच उपस्थित कामगार व स्थानिक रहिवाशांनी  त्यांची स्वच्छता करून श्रद्धेने पूजा-अर्चा करण्यास सुरुवात केली. काही वेळातच ही बातमी परिसरात पसरली आणि भाविकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. दिवे लावून, फुले अर्पण करून भाविकांनी दर्शन घेतले, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या ठिकाणी खोदकामात प्राचीन मूर्ती सापडल्‍याने इतिहासाच्या दृष्टीने त्‍याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यादवकाल (इ.स. १२वे ते १४वे शतक) हा महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य व शिल्पकलेचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळातील मूर्ती सापडणे म्हणजे या परिसरात पूर्वी धार्मिक व सांस्कृतिक केंद्र अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतात. स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या मते, या ठिकाणी पूर्वी शिव, शनी व देवीची जुनी मंदिरे होती, जी कालांतराने नष्ट झाली.
दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून, पुरातत्त्व तज्ज्ञांकडून या मूर्तींचे वय, शैली आणि ऐतिहासिक महत्त्व तपासले जाण्याची शक्यता आहे. भविष्यात या परिसरात आणखी प्राचीन अवशेष सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनपेक्षित शोधामुळे खोल गल्ली परिसरात श्रद्धा, उत्साह आणि ऐतिहासिक कुतूहल यांचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button