तोरणमाळच्या गोरक्षनाथ मंदिराच्या महंतांवर सशस्र हल्ला; मारहाण करून पैसे पळवले, मंदिरावर दगडफेक करीत गाडीही फोडली; तिघांच्या टोळीचे कृत्य

म्हसावद (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वर्षभरापूर्वी दाखल केलेली फिर्याद मागे घेत नसल्याच्या रागातून निघांनी धडगाव तालुक्यातील जुने तोरणमाळ येथील श्री गोरक्षनाथ महाराज मंदिराच्या महंतांवर शस्रांनिशी हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२६) मध्यरात्री घडली. या घटनेत महंत योगी संजू नाथ गंभीर जखमी झाले असून, घटनास्थळावरून फरार झालेल्या टोळीचा म्हसावद पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी संजू नाथ हे जुने तोरणमाळ येथील श्री गोरक्षनाथ महाराज मंदिराचे महंत म्हणून कार्यरत आहेत. वर्षभरापूर्वी एप्रिल २०२५ मध्ये गुंजन कमलेश इंचुरकर (रा. नाथ दरबार, पानसेमल, जि. वडवाणी, मध्यप्रदेश) याच्याविरोधात एका प्रकरणात म्हसावद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही फिर्याद मागे घ्यावी म्हणून गेल्या वर्षभरापासून गुंजन योगी संजू नाथ यांच्या मागे लागला होता. मात्र, ते सातत्याने नकार देत होते.
याच रागातून गुंजन त्याच्या दोन सहकार्यांसह (नावे माहिती नाहीत) गुरुवारी (दि.२६) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास श्री गोरक्षनाथ महाराज मंदिर आवारातील योगी संजू नाथ राहत असलेल्या खोलीजवळ आला. तेथे या तिघांनी त्यांच्याशी वाद घालतानाच शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. तेथून बाहेर पडताना या तिघांनी मंदिर तसेच परिसरावर दगडफेक केली. यात योगी संजू नाथ यांच्या डोक्यावर व छातीवर जखमा झाल्या. एवढेच नाही तर या तिघांनी योगींच्या मालकीच्या एमजे हेक्टर (एमएच १९ डीएक्स ५७६६) या चारचाकी वाहनाचे नुकसान केले. यानंतर हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले, असे योगी संजू नाथ यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून गुंजन इंचुरकर व त्याच्या दोन सहकार्यांविरोधात म्हसावद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.



