चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गेले; झिरवळांना राष्ट्रवादीचे अभय, पण मुख्यमंत्री म्हणाले, व्हीडिओची सत्यता तपासून कारवाई करू

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : भोंदूबाबा अशोक खरातच्या चरणी लीन होणार्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागले आहे. चाकणकर यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे, एका तृतीयपंथीयासोबत अश्लील व्हीडिओ व्हायरल झालेले मंत्री नरहरी झिरवळ यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी झिरवळ यांच्या व्हीडिओची सत्यता तपासून गरज पडल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदू बाबा याच्याशी जवळिकीची संबंध उघड झाल्यामुळे गदारोळ उठल्याने रुपयाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपद सोडले नव्हते. परंतु, याबाबत विरोधकांकडून सातत्याने टीका होऊ लागल्याने अखेर शुक्रवारी संध्याकाळी उशीरा त्यांनी या पदाचाही राजीनामा दिला.
दरम्यान, चाकणकर अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका राहिल्या आहेत. खरात प्रकरणात सर्व दोषींवर तसेच त्याच्याशी संबंधित कुणालाही सोडणार नाही. शिवनिका ट्रस्टशी संबंधित सर्वांची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने आता चाकणकर यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता असून, यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
झिरवळांचा राजीनामा नाही : राष्ट्रवादी
दुसरीकडे, एका तृतीयपंथियासोबतचा कथित व्हीडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांना त्यांच्या पक्षाने तूर्तास अभय दिले आहे. एखाद्या प्रकरणात केवळ आरोप झाले म्हणजे लगेच राजीनामा घेण्याची गरज नाही, असे स्पष्ट करीत राष्ट्रवादी काँग्रेसने झिरवळ यांचा लगेच राजीनामा मागितला जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्याचवेळी झिरवळ यांनी या व्हीडिओच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खुलासा केला असून, ‘तो’ कथित व्हीडिओ दोन -चार चित्रफिती एकत्र करून तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हीडिओची सत्यता पडताळणी केली जात असल्याचे म्हटले आहे. या सत्यता पडताळणीनंतर झिरवळ दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे झिरवळ यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.



