कुंपणच शेत खाते तेव्हा… : साखर कारखान्याच्या गोदामातून साखरेची सहा पोती लंपास; दोन वॉचमनवर गुन्हा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : साखर कारखान्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकांनीच कारखान्याच्या गोदामात ठेवलेल्या साखरेच्या पोत्यांवर डल्ला मारल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील समेशरपूर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन सुरक्षारक्षकांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथे आयान मल्टिट्रेड एल.एल.पी. या साखर कारखान्याची साईट असून, याच आवारात कारखान्याचे गोदामात आहे. या गोदामात कारखान्यात उत्पादित साखरेचे पोते ठेवलेले आहेत. या गोदामाच्या सुरक्षेची जबाबदारी अनिल वनसिंग ठाकरे व मुकेश भाग्यशाल मोरे (दोघेही रा. समशेरपूर, ता. व जि. नंदुरबार) या दोघांकडे होती. २४ मार्च रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास या दोघांनी गोदामातील ५० किलो वजनाचे आणि प्रत्येकी १ हजार ८९५ रुपये किमतीचे सहा पोते असा एकूण १० हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार कारखान्याचे लेबर ऑफिसर गोविंद बाळासाहेब भगत यांनी २६ मार्च रोजी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक मोतीराम बागुल करीत आहेत.



