नंदुरबार जिल्हा

शहाद्यात दुचाकीला फक्‍त १ तर कारसाठी मिळणार ५ लिटर पेट्रोल; तहसीलदारांनी घालून दिली इंधन विक्रीवर मर्यादा

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : लांबत चाललेल्‍या युद्धामुळे इंधन संपण्‍याची अपवा आणि त्‍या भीतीपोटी पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी होत असलेल्‍या गर्दीच्‍या पार्श्वभूमीवर अखेर शहाद्यामध्‍ये इंधन विक्रीवर तहसीलदारांनी मर्यादा घालून दिल्‍या आहेत. या निर्बंधानुसार आता शहादा तालुक्‍यात दुचाकीधारकांना एकच तर छोट्या चारचाकी वाहनांना (कार, जीप) पाचच लिटर इंधन मिळू शकणार आहे.
जागतिक स्‍तरावर निर्माण झालेल्‍या युद्धजन्‍य परिस्‍थितीमुळे पेट्रोलियम पदार्थांच्‍या पुरवठ्यावर परिणाम होण्‍याची चर्चा सध्‍या जोरात सुरू आहे. याच अनुषंगाने शहादा तालुक्‍यात इंधन वितरणावर तात्‍पुरते निर्बंध लागू करण्‍यात आले आहेत. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, शहादा यांच्‍या कार्यालयातून २७ मार्च रोजी उशीरा तसा आदेश जारी करण्‍यात आला आहे.
या आदेशानुसार दुचाकी वाहनांना (मोटारसायकल) एक लिटर, लहान स्‍वरूपातील चारचाकी वाहनांना (कार, जीप) ५ लिटर पेट्रोल तर अवजड वाहनांना ३० लिटरपेक्षा जास्‍त इंधन देण्‍यास मनाई करण्‍यात आली आहे.
तालुक्‍यातील सर्व पेट्रोल पंपचालकांना इंधन वितरणाबाबत विशिष्‍ट नियमांचे काटेकोर पालन करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. आरोग्‍य, पोलिस, महसूल तसेच इतर अत्‍यावश्‍यक सेवांमध्‍ये कार्यरत शासकीय वाहनांना आवश्‍यकतेनुसार इंधन पुरवठा सुरू ठेवावा, असेही या आदेशात म्‍हटले आहे. या आदेशाचे उल्‍लंघन करणार्‍या पेट्रोल पंप चालकांवर आवश्‍यक वस्‍तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कडक कारवाई करण्‍यात येईल, असेही तहसील प्रशासनाने आपल्‍या आदेशात स्‍पष्‍ट केले आहे.
दरम्‍यान, शहादा तालुक्‍यासह जिल्‍ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्‍ध असून, वाहनधारकांनी अपवांवर विश्‍वास न ठेवता गरजेपुरते इंधन खरेदी करावे, अनावश्‍यक साठा करून ठेवू नये, असे आवाहनही तहसील प्रशासनाने केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button