नंदुरबार जिल्हा

शहाद्यात ५६ टक्के मतदारांचे एसआयआर मॅपिंग पूर्ण; चार दिवसांत टक्‍का ९० च्‍या पुढे जाण्‍याची कनवारियांना खात्री, तुमच्‍या नावाची पडताळणी केली का?…

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील मतदारयाद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेली विशेष माहिती पुनरावलोकन (एसआयआर) मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली असून, येत्या चार दिवसांत ९० टक्के काम पूर्ण होईल, असा विश्वास सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी व्यक्त केला आहे. शहरातील एकूण २ लाख २ हजार ४३५ मतदारांपैकी सुमारे ५६ टक्के मतदारांचे एसआयआर मॅपिंग पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी १० वाजता नगरपालिका टाऊन हॉल सभागृहात या मोहिमेच्या तयारीचा व प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कनवारिया यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदार याद्यांचे बारकाईने आणि पद्धतशीर पुनरावलोकन करण्याच्या सूचना दिल्या. ही मोहीम निवडणूक आयोगाची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, मतदार यादीतील त्रुटी दूर करून निवडणुका निःपक्ष व पारदर्शक करण्याचा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने या प्रक्रियेसाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत निश्चित केली असून, या कामासाठी टाऊन हॉलमध्ये २५ टेबलची व्यवस्था केली आहे. नगरपालिका, महसूल व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचा यात सक्रिय सहभाग आहे. पालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनीही मतदारांना या मोहिमेत सहभागी होण्‍याचे आवाहन केले आहे.
शहराबरोबरच तालुक्यातील १५१ ग्रामपंचायतींसाठी तीन दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. नवमतदार नोंदणीला चालना एसआयआर अंतर्गत घरोघरी जाऊन पडताळणी केली जात असून, या प्रक्रियेदरम्यान नव्याने १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात आहेत. त्याचबरोबर मृत व्यक्ती, स्थलांतरित नागरिक आणि डुप्लिकेट नावे वगळण्याचे कामही सुरू आहे. आधीच मतदार असलेल्‍यांना त्‍यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा लिंग यातील चुका दुरुस्त करण्याची संधी दिली जात आहे.
विभाजित नावे एकत्र करण्यावर भर अनेक कुटुंबांतील सदस्यांची नावे मतदार यादीत वेगवेगळ्या भागात नोंदवल्याचे आढळून आले आहे. एसआयआर प्रक्रियेद्वारे अशा विभाजित नावांना एकत्र आणण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. केवळ आपले मतदान ओळखपत्र सोबत आणून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button