शहादाकरांची अडचण आ. चंद्रकांत रघुवंशींनी केली दूर; गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली रुग्णवाहिका

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहर व परिसरातील रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न होण्याची अडचण आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी कायमची दूर केली आहे. आता शहादा शहर व परिसरातील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी ‘ना नफा-ना तोटा या तत्वावर ही रुग्णवाहिका २४ तास शहाद्यातील शिवसेना संपर्क कार्यालयात उपलब्ध राहणार आहे.
शहादा व परिसरातील रुग्णांचे रुग्णवाहिकेविना होणारे हाल पाहून स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या भागासाठी कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे केली होती. या विनंतीला मान देत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आ. रघुवंशी यांनी केली आहे.
नंदुरबार येथे आ. रघुवंशी यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, जेष्ठ नेते सुपडू खेडकर, युवा सेना उप जिल्हाप्रमुख राजरत्न बिरारे, हेमंत सुर्यवंशी, गणेश माळी, धनराज जायसवाल, लखीचंद जायसवाल यांच्याकडे रुग्णवाहिका सुपूर्द केली. यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील आबा पाटील, हस्ती बैंकचे अध्यक्ष ईश्वर जैन, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, रोहिदास राठोड, अनिल पाटील, दुर्गेश वैष्णव व पप्पू गिरासे उपस्थित होते. यावेळी मनलेश जायसवाल यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. रघुवंशी यांचे आभार मानले.
शहादा येथील शिवसेना संपर्क कार्यालय येथे संपर्क केल्यास रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना ही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकेल. यासाठी शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या ९४२२७९०१२६ किंवा ९११२९६२५२५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकेल.



