अक्कलकुवा तालुक्यात प्रेमसंबंधांतून तरुणाचा खून; ७ जणांनी आधी तुडवले अन् नंतर दरीत फेकून दिले; ‘मारून टाका’ म्हणत अल्पवयीन प्रेयसी मेव्हणीच देत होती चिथावणी

अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : प्रेमसंबंधांतून नातेवाईकांनीच ३० वर्षीय तरुणाचा जबर मारहाण करीत खून करून नंतर मृतदेह दरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा तालुक्यातील खाई (गोरबाजारी पाडा) येथे घडली आहे. या प्रकरणी आठ जणांवर मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपी फरार झाले आहेत. विशेष म्हणजे आरोपींमध्ये या तरुणाची सख्खी मेव्हणी असलेल्या अल्पवयीन प्रेयसीचाही समावेश असून, मारहाण करणार्यांना ती ‘याला मारून टाका’ म्हणत चिथावणी देत होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजा बाज्या पाडवी (३०, रा. खाई गोरबाजारी पाडा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. बिजा पाडवी आणि त्याची सख्खी मेव्हणी असलेल्या अल्पवयीन मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, या संबंधांना त्यांच्या नातेवाईकांचा विरोध होता.
२६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास विजा पाडवी हा पत्नी आणि अल्पवयीन प्रेयसी यांच्या सोबत गावानजीकच्या डोंगर भागातून निघाला होता. याचवेळी प्रेमसंबंधांना विरोध असलेल्या ७ नातेवाईकांनी त्यांना गाठून विजा याला या संबंधांबाबत जाब विचारला. यावेळी त्यांच्यात वाद झाल्यानंतर काही क्षणांतच सातही आरोपी विजावर तुटून पडले. आरोपींनी त्याला शिविगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यात विजा खाली पडल्यानंतर आरोपींपैकी एकाने त्याचा गळा दाबला. यात श्वास गुदमरून विजा पाडवी याचा जागीच मृत्यू झाला. विजा याची पत्नी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींपैकी एकाने तिच्याही पाठीवर हाताने वार केला.
विशेष म्हणजे अन्य सात आरोपी विजा याला मारहाण करीत असताना त्याची सख्खी मेव्हणी आणि अल्पवयीन प्रेयसी ‘त्याला मारून टाका’ असे ओरडत आरोपींना चिथावणी देत होती, असे विजा याच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे.
क्रुरतेचा कळस; २०० मीटर खोल दरीत फेकले
मारहाणीत विजा याचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपींचा राग कमी झाला नव्हता. आरोपींनी त्याचा मृतदेह उचलून जवळच्या सुमारे २०० मीटर खोल दरीत फेकून दिला. महत्त्वाचे म्हणजे हा मृतदेह पूर्ण खाली न जाता सुमारे शंभर मीटर अंतरावरच झाडाला अडकून राहिला. नंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मोलगी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक रहिवाशांच्या मदतीने विजा पाडवी याचा मृतदेह वर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, या प्रकरणी विजा पाडवी याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून खाअल्या भांगा पाडवी, गोरख्या विजा पाडवी, विजा पुन्या पाडवी (तिघेही रा. खाई गोरबाजारी पाडा), दिपला पेचरा वसावे, जगनसिंग दिपला वसावे, गुला गोमा वळवी, साहिल सुर्या वसावे (सर्व रा. भराडीपादर ता. अक्कलकुवा) आणि मयत विजा बाज्या पाडवी याची अल्पवयीन प्रेयसी (रा. खाई गोरबाजारी पाडवी) या आठ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), ४६, ११५ (२), १८९ (२), १९१ (२), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मोलगीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक पावरा करीत आहेत.



