‘तो’ आरोप म्हणजे पोरकटपणा : नगराध्यक्ष अभिजित पाटील; म्हणाले, पालिकेचा कारभार पारदर्शी व्हावा, हीच माझी भूमिका, सर्वसाधारण सभेसाठी पत्रकारांनाही आमंत्रण

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पालिकेचा कारभार अत्यंत पारदर्शीपणे झाला पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. ३० मार्चला होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकार बांधवांनी उपस्थित राहत वार्तांकन करावे, असे सांगत लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना येऊ देऊ नये, अशी भूमिका नगराध्यक्ष घेत असल्याच्या विरोधकांच्या आरोपाचे खंडन केले. पत्रकारांना मी पालिकेत येऊ देत नाही, हा आरोप म्हणजे निव्वळ पोरकटपणा असल्याचा पलटवारही त्यांनी केला.
पालिकेचा सर्वसाधारण सभेत पत्रकारांना येऊ देऊ नये, अशी भूमिका नगराध्यक्ष घेत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. यावर नगराध्यक्ष पाटील म्हणाले, पत्रकारांना सर्वसाधारण सभेत प्रवेश देणार आहोत, हे आम्ही आधीच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही ३० तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे आमंत्रण पत्रकारांना सोशल मीडियावरून दिले आहे. पत्रकार हे लोकशाहीचा प्रमुख घटक आहेत.
अतिशय पारदर्शकपणे काम करण्याचा माझ्या स्वभाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपकडे विषक समित्या आहेत. सभापतीही त्यांचेच आहेत. पालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विषयांना मंजुरी किंवा ना मंजुरी देत असताना भाजपच्या सदस्यांनी विषय स्थगित ठेवावेत आणि विषय समितीच्या मीटिंगमध्ये मंजुरीनंतरच ते सर्वसाधारण सभेपुढे ठेवावेत, अशी भूमिका घेतली. बहुमत त्यांच्याकडे असल्याने नगराध्यक्ष या नात्याने मी सर्व विषय समित्यांकडे वर्ग केले, असे सांगतानाच पाटील यांनी विषय समित्यांच्या मीटिंगमध्ये कधीही पत्रकारांना समावेश का दिला नाही, असा प्रश्न भाजपला केला.
लोकशाहीच्या गळा आवळण्याचा तुमच्याकडूनच प्रयत्न होत तर नाही ना? पारदर्शक कारभार तुम्हाला करायचा नाही का? असे प्रतिप्रश्न मी विचारू शकतो. परंतु प्रशासन चालवताना काही गोष्टी मागेपुढे होत असतात, याची जाणीव असल्याने मी शांत आहे, असेही पाटील म्हणाले.



