नंदुरबार जिल्हा

नंदुरबारचे ७५ सरकारी कर्मचारी होणार निलंबित; प्रस्‍ताव जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या टेबलवर; एसआयआर मॅपिंग कामात हलगर्जीपणा भोवणार

शहादा / नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यातील मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेली विशेष माहिती पुनरावलोकन (एसआयआर) मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच या मोहिमेत कामचुकारपणा करणे ७५ सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाईची कुर्‍हाड कोसळण्‍याची शक्‍यता आहे. या सर्व ७५ कर्मचार्‍यांच्‍या निलंबनाचा प्रस्‍ताव प्रशासनाने जिल्‍हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्‍याकडे पाठविण्‍यात आला असून, डॉ. सेठी कोणत्‍याही क्षणी यावर निर्णय घेण्‍याची शक्‍यता आहे.
निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार आगामी निवडणुकांच्‍या अनुषंगाने मतदारयाद्या अजूक आणि अद्ययावत करण्‍याची मोहीम राज्‍यात हाती घेण्‍यात आली आहे. देशातील पहिल्‍या क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्‍या नंदुरबार जिल्‍ह्यातही या मोहिमेने वेग घेतला असून, जिल्‍हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी जिल्‍ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदार याद्यांचे बारकाईने आणि पद्धतशीर पुनरावलोकन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्‍हाधिकार्‍यांचे आदेश धाब्‍यावर
ही मोहीम निवडणूक आयोगाची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, मतदार यादीतील त्रुटी दूर करून निवडणुका निःपक्ष व पारदर्शक करण्याचा यामागील उद्देश आहे. निवडणूक आयोगाने या प्रक्रियेसाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत निश्चित केली असून, तोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्‍याच्‍या हेतूने जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या आदेशानुसार अधिकारी -कर्मचारी कामाला लागले आहेत. असे असताना काही कर्मचार्‍यांकडून मात्र जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या आदेशाला केराची टोपली दाखवून कामचुकारपणा सुरू केला जात असल्‍याचे समोर आले आहे.
आता कारवाईची कुर्‍हाड
एसआयआर मॅपिंग मोहिमेत हलगजींपणा करणार्‍या कर्मचाऱ्यांबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. या मोहिमेच्‍या कामात निष्काळजीपणा केल्‍याबद्दल प्रशासनाने आधीच ७५ कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्‍या होत्‍या. मात्र, त्यानंतरही सुधारणा न झाल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली शेट्टी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी शहादा येथे दिली. दरम्‍यान, आता या प्रस्‍तावावर जिल्‍हाधिकारी डॉ. सेठी कोणत्‍याही क्षणी निर्णय घेण्‍याची शक्‍यता असल्‍याने या ७५ कर्मचार्‍यांचे निलंबन अटळ मानले जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button