त्रासाला कंटाळून महिलेने एकाच्या मदतीने कांतिलालला संपवले; तळोद्यातील त्या खुनाचा अखेर उलगडा; एलसबीची आणखी एक धडाकेबाज कारवाई

तळोदा / नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गुन्हे उघडकीस आणण्यात अग्रेसर असलेल्या नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या स्थानिक अन्वेषण शाखेने (एलसीबी) आणखी एका खुनाचा उलगडा करण्यात यश मिळविले आहे. तळोदा तालुक्यातील सतोना शेतशिवारात झालेल्या कांतिलाल मोतीराव वळवी यांचे मारकरी एलसीबीने अवघ्या दोन दिवसांत शोधून काढले असून, सततच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने अन्य एका साथीदाराच्या साथीने कांतिलालला संपवल्याचे स्पष्ट झाले आहे. एलसीबीने दोन्ही मारेकर्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या व्यक्तीचे नाव कांतिलालभाई मोतीराव वळवी (५७, रा. बालंबा, ता. कुकरमुंडा, जि. तापी, गुजरात) असे आहे. २५ मार्च रोजी तळोदा तालुक्यातील सतोना शेतशिवारातील विनोद मंगा वळवी यांच्या गट क्र. ३७ मधील शेतात एका व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर या व्यक्तीच्या डोक्यावर अज्ञात वस्तूने प्रहार करून नंतर दोरीने गळा आवळून त्याला मारून टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला होता. कांतिलालचा मुलगा महेंद्र याने गुजरातेतून तळोदात येऊन पोलिसांत तक्रार नोंदवली होती.
कांतिलाल वळवी कोणत्या कामासाठी आणि कधी तळोदा तालुक्यात आले होते, त्यांचा खून येथे आल्यानंतर करण्यात आला की आधीच अन्यत्र मारून त्यांना सतोना शिवारात आणून टाकले याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी हे प्रकरण तपासासाठी एलसीबीकडे सोपवले होते.
एलसीबीने सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्व अंगांनी तपास केल्यानंतर या खुनामागे एक महिला असल्याचा अँगल समोर आला. पोलिसांनी मोगराबाई अजित वळवी (४०, अमोदा, तळोदा) या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने कांतिलालभाई हा सातत्याने आपल्याला त्रास देत असल्याने आपण कांतिलाल दशरथ पाडवी (रा. शेलवाई, ता. तळोदा) याच्या मदतीने कांतिलालभाईला संपवल्याची कबुली दिली. हे दोघे २५ मार्चला त्यांना सतोना शेतशिवारातील विनोद मंगा वळवी यांच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्यांना आधी जबर मारहाण केल्यानंतर गळा दाबून मारून टाकले, असे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोन्ही मारेकर्यांना अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अतिरिक्त पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, हवालदार दादाभाई वाघ, विशाल नागरे, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे, राजेंद्र काटके यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.



