राजकारण

शहाद्यात नगराध्‍यक्ष विरूद्ध उपनगराध्‍यक्ष, राजकीय वाक्‌युद्ध शिगेला; ‘पोरकटपणा’च्‍या आरोपावर माधवी पाटील भडकल्‍या; अभिजित पाटील यांच्‍या भूमिकेचा घेतला समाचार

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : जागतिक रंगमंचावर युद्ध शिगेला पेटलेले असतानाच शहादा शहरात नगराध्‍यक्ष अभिजित पाटील आणि उपनगराध्‍यक्ष माधवी मकरंद पाटील यांच्‍यात राजकीय वाक्‌युद्ध रंगले आहे. नगरपालिकेच्‍या सभेत पत्रकारांना प्रवेश न देण्‍याचा आरोप नगराध्‍यक्षांनी केल्‍यानंतर आता उपनगराध्‍यक्षा माधवी पाटील ‘नेमका कोण पोरकटपणा करीत आहे, हे शहाद्याची जनता उघड्या डोळ्‍यांनी पाहत आहे’ अशा शब्‍दांत नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांना प्रत्‍युत्तर दिले आहे.
शहादा शहर विकासाचा स्पष्ट अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीत जनतेसमोर गेलो होतो आणि शहरवासीयांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार बांधवांना प्रवेश मिळावा, ही लोकशाही मूल्यांची जोपासना करणारी आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. मात्र, प्रशासनाकडून पहिल्या दोन सभांना पत्रकारांना प्रवेश नाकारून नेमके काय लपवले जात आहे, असा सवाल उपस्थित करीत उपनगराध्यक्षा माधवी मकरंद पाटील यांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना पत्र दिले आहे.
या विषयावर सोशल मीडियाद्वारे नगराध्यक्षांची प्रतिक्रिया आल्याने त्‍यांच्‍या भूमिकेचाही माधवी पाटील यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. त्‍या म्हणाल्या, नगरपालिकेचा कारभार हा जनतेचा कारभार आहे. तो पारदर्शक असावा आणि तो पत्रकारांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावा, हीच आमची मागणी आहे. पहिल्या दोन सभांमध्ये मज्जाव केल्याने पत्रकारांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. याची दखल घेत मी उपनगराध्यक्षा व विरोधी पक्ष गटनेत्या या नात्याने मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन पत्रकार बांधवांना सभेचे वृत्तांकन करण्यासाठी प्रवेश देण्याची आग्रही मागणी केली आहे.
मात्र, जनहितार्थ असलेल्‍या या या मागणीवर विद्यमान नगराध्यक्षांनी सोशल मीडियाद्वारे जी प्रतिक्रिया दिली, त्यातून त्यांचा संकुचित दृष्टिकोन दिसून येतो. पालिकेच्या कामकाजात नातेसंबंध किंवा ‘अनुभवी-बिगर अनुभवी’ असा भेदभाव करण्याचा आमचा हेतू नाही. पोरकटपणा नेमका कोण करतंय, हे शहाद्याची जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे आणि ती योग्य न्याय करेलच.
शहरातील जनतेने २९ पैकी तब्बल २० नगरसेवक आणि २ स्वीकृत सदस्यांना निवडून देऊन आमच्यावर दाखवलेल्‍या विश्‍वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. या २२ जणांच्या भक्कम पाठबळावर आम्ही शहरवासीयांचा विश्वास सार्थकी लावू आणि पालिकेच्या कारभारात पूर्ण पारदर्शकता आणूनच राहू, असा निर्धारही माधवी पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button