खरातचे ‘ते’ व्हीडिओ व्हायरल करणे पडेल महागात; थेट जेलमध्ये होईल रवानगी; आतापर्यंत ७४ जणांवर गुन्हा
नाशिक (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे नवनवीन कारनामे समोर येत असतानाच दुसरीकडे त्याच्या अश्लील कृत्यांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, यावर आता पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून, अशोक खरातच्या आक्षेपार्ह व्हीडिओतून पीडित महिलांची ओळख जगाला होत असल्याने हे व्हीडिओ व्हायरल करणार्यांवर थेट गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे. सायबर पोलिसांनी आतापर्यंत अशा ७४ जणांवर गुन्हे दाखल केले असून, या सर्वांना लवकरच कारागृहाची हवा खावी लागणार आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण लागले आहे. पीडित महिलांचे आक्षेपार्ह आणि मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे. हे व्हीडिओ व्हायरल करणार्यांवर गुन्हे दाखल करतानाच पोलिसांनी याची सुरूवात कुठून झाली, याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
अशोक खरातच्या काळ्या कृत्यांचे व्हीडिओ शेअर करून पीडित महिलांच्याच सन्मानावर दुसरा घाव घातला जात आहे. सोशल मीडियावर खरातचे आक्षेपार्ह आणि मॉर्फ व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हीडिओंच्या व्हायरल होण्याचा वेग प्रचंड असून, हे व्हीडिओ अवघ्या काही मिनिटांत हजारो लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सायबर पोलिसांनी आतापर्यंत ७४ जणांवर आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. नाशिक सायबर पोलीस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनपासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट धारकांचाही समावेश आहे, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली आहे.
एआय व मॉर्फिंगचा वापर करून बनावट व्हीडिओ
धक्कादायक बाब म्हणजे हे व्हीडिओ व्हायरल करण्याचा खेळ खरातचेच काही जुने निकटवर्तीय किंवा त्यांच्या संपर्कातील लोकांनी सुरू केल्याचा संशय पोलिसांना आहे. एआय आणि मॉर्फिंगचा वापर करून बनावट व्हिडीओ तयार केले जात असल्याचेही समोर येत आहे. कायद्याच्या दृष्टीने असे बनावट व्हीडिओ बनवणारा आणि फॉरवर्ड करणारा दोघेही गुन्हेगार ठरतात.
सायबर पोलिसांचा इशारा
सायबर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिलाय की आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड किंवा फॉरवर्ड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तुमच्या मोबाईलवर असे व्हीडिओ आल्यास ते लगेच डिलीट करा आणि संबंधित प्लॅटफॉर्मवर रिपोर्ट करा. एका गुन्ह्याची चौकशी सुरू असताना पीडितांच्या सन्मानाशी खेळणे हा मोठा गुन्हा ठरतो म्हणूनच जागरूक नागरिक म्हणून जबाबदारीने वागणं गरजेचे आहे, असे सांगण्यात आले आहे. या संवेदनशील प्रकरणात आक्षेपार्ह व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नका, असे आवाहनही नाशिक पोलिसांनी केले आहे.



