अपडेट बातमी : शहाद्यातील कोंडावळच्या कपिल ट्रेडर्सचा परवाना कायमचा रद्द; खत दुकानदारांवर ‘कृषी’ची धडक कारवाई, आणखी सहा जणांचे परवाने निलंबित

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ऐन शेती हंगाम सुरू होत असतानाच खतांची अवैध साठेबाजी करून जादा दराने विक्री करणार्या दुकानदारांना नंदुरबार जिल्हा कृषी विभागाने जोरदार दणका दिला आहे. खत विक्रीच्या नियमांचे उल्लंघन करून शेतकर्यांची अडवणूक करणार्या शहादा तालुक्यातील कोंडावळ येथील कपिल ट्रेडर्स या खत विक्री दुकानदाराचा परवाना कृषी विभागाने कायमस्वरूपी रद्द केला असून, शहाद्यातीलच पाच तर नवापुरातील एक अशा एकूण सहा दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहेत.
खरीप हंगामात शेतकर्यांना दर्जेदार खते उपलब्ध व्हावीत, खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून अवैध साठेबाजी व जादा दराने खतांची विक्री केली जावू नये यासाठी कृषी विभागाने जिल्हाभरात खत विक्री केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याच अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी व खत नियंत्रण पथकांनी जिल्ह्याच्या विविध विभागांतील खत विक्री दुकानांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीदरम्यान खत विक्री केंद्रांवरील विक्री नोंदवही, स्टॉक रजिस्टर, खत साठा, बिलिंग प्रणाली, तसेच शासनाच्या खत विक्री नियमांचे पालन होते की नाही, याची पडताळणी केली जात आहे.
यांच्यावर झाली कारवाई
कोंडावळ (ता. शहादा) येथील कपिल ट्रेडर्स या दुकानदाराकडून या नियमांचे पूर्ण उल्लंघन केले जात असल्याने कृषी विभागाच्या पथकाने या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. तर याच तालुक्यातील नागेश्वर ॲग्रो (असलोद), निशांत ॲग्रो (म्हसावद), ग्रीन अँड गोल्ड ॲग्रो (कुढावद), नर्मदा ॲग्रो (शहादा) व न्यू स्वामी समर्थ ॲग्रो (तोरखेडा) या आणखी ५ दुकानदारांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. याशिवाय नवापूर तालुक्यातही एका दुकानदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नंतर या विषयावर सुनावणी घेऊन सदर दुकानदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
…म्हणून झाली कारवाई
या सर्व दुकानदारांवर दुकानात दर्शनी ठिकाणी साठा फलक व किंमत फलक न लावणे, साठाबूक नसणे किंवा अद्ययावत न ठेवणे, शेतकर्यांना योग्य बिले न देणे, ई-पॉस मशीनवर साठा प्रलंबित असणे अशा नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शहाद्याचे कृषी अधिकारी विशाल वाकचौरे यांनी दिली.



