नंदनगरीचे खेळाडू सार्यात भारी : राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत नंदुरबारला १० सुवर्ण, ३ रौप्य, ६ कांस्य पदके; दमदार कामगिरीने जिंकली मने

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नाशिक येथे संपन्न झालेल्या २२व्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत एकूण १० सुवर्ण, ३ रौप्य आणि ६ कांस्य पदके पटकावली आहेत. या भव्य स्पर्धेचे आयोजन जम्परोप फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० मार्च दरम्यान करण्यात आले होते.
ही स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडली. देशभरातील दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात आदी राज्यांमधून सुमारे ५४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना नंदुरबार जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या जानवी वसावे, भाव्या गवळी, स्मिता वसावे, प्रांजल खेडकर, गलवी पटेल या खेळाडूंनी सिंगल लाँगरोप स्पीड या प्रकारात तर अनुज जव्हेरी, राहुल सुळे, चैतन्य देसले, आदित्य जमदाळे, ओम गोसावी यांनी डबल अंडर पिअर या प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. निर्मल पिंपरे, कौशल् कोळी यांनी ३० सेकंद डबल अंडर पिअर या प्रकारात तर हिताक्षी सोनवणे हिने ३० सेकंद स्पीड या प्रकारात रौप्यपदक मिळविले. कैवल्य खंडारे, अनुज पाडवी ३ मिनिट इंडोरस या प्रकारात कांस्यपदक मिळविले. तन्वी चौधरी, प्रचिता गावित, भाग्यश्री चौधरी धनश्री पाडवी यांनी ३० सेकंद स्पीड रिले या प्रकारात कांस्यपदक मिळविले. या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य व जिद्द दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध गटांमध्ये खेळाडूंनी प्रभावी प्रदर्शन करत पदकांची लयलूट केली.
या यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे. विधान परिषद सदस्य आ. चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा जम्परोप असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रघुवंशी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच प्रशिक्षक, जिल्हा जम्परोप असोसिएशन सचिव रामा हटकर, कुणाल अंबेकर, नितीन सोनार, तुषार सोपनर, जगदीश जाधव, गजेंद्र सुळ यांच्यासह पालकांचेही कौतुक केले. त्यांनी खेळाडूंनी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.



