भरधाव ट्रकची पिकअप व्हॅनला धडक; ७ सफाई कामगार महिलांचा मृत्यू; ९ गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

छत्रपती संभाजीनगर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मुंबई – नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि. १) सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. भरधाव ट्रकने सफाई कामगारांना घेऊन निघालेल्या पिकअप व्हॅनला दिलेल्या जोरदार धडकेत ७ महिला कामगारांचा मृत्यू, ९ महिला कामगार गंभीर जखमी झाल्या. जालन्याजवळील जामनेर–कडवंची शिवारात ही भीषण दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जालना व बदनापूर तालुक्यातील सफाई कामगार असलेल्या महिला समृद्धी महामार्गावर गवत काढण्याच्या कामावर होत्या. काम आटोपून या महिला कंत्राटदार एजन्सीच्या पिकअप व्हॅनमधून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. या महिला बसलेले वाहन रस्त्याच्या कडेला उभे असताना नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरात धडक दिली. या धडकेत कामगारांच्या पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला.
या अपघातात कडूबाई रामदास मदन, ताराबाई गहिनाजी चौधरी, लक्ष्मी संतोष मदन (सर्व रा. केळीगव्हाण, ता. बदनापूर), अलका दादाराव आदमाने, मीना परमेश्वर आदमाने, कांचन प्रकाश आदमाने, सुमनबाई कचरू आदमाने (सर्व रा. निधोना ता. जालना) या सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ९ महिला कामगार गंभीर जखमी झाल्या.
महामार्ग पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जालन्याच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या अपघातामुळे नागपूर ते मुंबई या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक सुरळित करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.



