नंदुरबार शहर

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना अधिकृत परवानेही देणार, आ. चंद्रकांत रघुवंशी यांचा पुढाकार

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहरातील इंदिरा मंगल कार्यालय परिसरात दर रविवारी भरणारा बाजार आता रेल्वे रुळापलीकडील उड्डाणपुलाखाली स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासोबतच, ‘दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार व्यावसायिकांना पालिकेमार्फत अधिकृत परवाने दिले जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
रविवार बाजारामुळे सातत्‍याने वाहतूक कोंडी होत असे. शिवाय बाजारात दुकान थाटणार्‍यांचे स्थानिक व्यापारी संकुलातील दुकानदारांशी वाद ही बाब नेहमीचीच झाली होती. हे वाद मिटवण्यासाठी बुधवारी पालिकेत आ. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, मुख्याधिकारी राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश गावित, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांसह पालिकेचे अधिकारी व व्यावसायिक उपस्थित होते.
नव्या जागेत शिस्तबद्ध नियोजन
बाजाराच्या नवीन ठिकाणी प्रत्येक व्यावसायिकाला जागा निश्चित करून दिली जाईल. त्यासाठी पांढरे पट्टे मारले जाणार असून, व्यावसायिकांना केवळ त्याच मर्यादेत आपले दुकान थाटावे लागेल. या जागेसाठी व्यावसायिकांना ठराविक शुल्क भरावे लागेल, ज्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही भर पडेल, असे निर्णय या बैठकीत घेण्‍यात आले. या निर्णयामुळे रविवार बाजारातील कटलरी, कपडे, खेळणी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शहराच्या मुख्य भागातील वाहतूकही मोकळी होणार आहे.

“रविवार बाजार हा अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यांना रोजगार मिळावा आणि नागरिकांनाही त्रास होऊ नये, असा सुवर्णमध्य आम्ही साधला आहे. परवाने मिळाल्यामुळे व्यावसायिकांना आता कायदेशीर संरक्षण मिळेल.”
– आ. चंद्रकांत रघुवंशी

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button