अनरदमध्ये उभारला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा; प्रशासनाशी चर्चेनंतर परवानगीपर्यंत पुतळा झाकून ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील अनरद गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रात्रीतून स्थापित करण्यात आल्याची घटना समोर आली असून, यामुळे प्रशासनात जोरदार हालचाल निर्माण झाली आहे. अखेर प्रशासनाने गावात जावून हरकत घेत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर परवानगी येईपर्यंत पुतळा झाकून ठेवण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शविली आणि भविष्यात नाहक होऊ घातलेल्या वादावर आजच पडदा टाकला.
बुधवारी (दि. १) रात्री अनरद गावात रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आल्याची माहिती प्रशासनातील अधिकार्यांना कळाली होती. त्यानंतर तातडीने सकाळपासून महसूल व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. शिवाजी महाराज हे शासकीय थोर पुरुषांच्या यादीत असल्याने त्यांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक शासकीय परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, परवानगी न घेता पुतळा स्थापित करण्यात आल्याने प्रशासनाने तत्काळ दखल घेतली.
गावात दाखल झाल्यानंतर वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकार्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
बराच वेळ झालेल्या या चर्चेत अखेर सकारात्मक तोडगा निघाला आणि पुतळा उभारण्यासाठी आवश्यक सर्व शासकीय परवानग्या मिळेपर्यंत पुतळा झाकून ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला. तसेच पुतळ्याच्या ठिकाणी सीसीटीव्हीची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुतळ्याचे अधिकृत लोकार्पण करण्यात येईल, असे ग्रामस्थांकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, गावात शांतता असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.



