मुख्य बातम्या

गोड बातमी : नंदुरबार- मुंबई कनेक्‍टिव्‍हिटीला ‘रेल्‍वे’चा बुस्‍टर डोस; दादर – भुसावळ एक्‍स्‍प्रेस झाली कायमस्‍वरूपी नियमित; प्रवासी भाडेही २५ टक्‍क्‍यांनी कमी होणार

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबारसह खानदेशातून राजस्‍थानातील प्रसिद्ध देवस्‍थान खाटूश्‍याम व अजमेर दर्गा जाण्‍यासाठी काकीनाडा-हिस्‍सार रेल्‍वे नियमित झाल्‍याच्‍या निर्णयाच्‍या दुसर्‍याच दिवशी नंदुरबारकरांसाठी आणखी एक गोड बातमी समोर आली आहे. ही बातमी देखील रेल्‍वे खात्‍यानेच दिली असून, आता या खात्‍याने दादर – भुसावळ एक्‍स्‍प्रेस गाडीला कायमस्‍वरूपी नियमित दर्जा दिला आहे. अत्‍यंत महत्त्‍वाच्‍या या मिळाल्‍यामुळे आता नंदुरबारसह खानदेशकरांची मुंबईशी कनेक्‍टिव्‍हिटी आणखी घट्ट होणार आहे.
खानदेश व मुंबईला जोडण्‍यासाठी दादर – भुसावळ ही रेल्‍वे प्रायोगिक तत्त्‍वावर सुरू करण्‍यात आली होती. तिला चांगला प्रतिसाद मिळाल्‍याने रेल्‍वे खात्‍याने काही बदलांसह ही गाडी कायमस्‍वरूपी नियमित करण्‍याचा निर्णय घेतला आहे. आता ही गाडी १९०४७ व १९०४८ या नव्‍या क्रमांकांसह सोमवार, बुधवार व शनिवार असे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे, अशी माहिती धुळ्‍याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.  
प्रवासी भाडे दरात होणार कपात
या निर्णयामुळे नंदुरबारसह जळगाव व धुळे या खानदेशातील तिन्‍ही जिल्‍ह्यांची मुंबईशी असलेली कनेक्‍टिव्‍हिटी आणखी मजबूत होण्‍यास मदत होणार आहे. महत्त्‍वाचे म्‍हणजे विशेष दर्जा हटविण्‍यात आल्‍याने या गाडीच्‍या प्रवासी भाडे दरात २० ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत कपात होणार असून, आता या गाडीचे भाडे खानदेश एक्‍स्‍प्रेस गाडीप्रमाणेच आकारले जाईल.
हक्‍काची गाडी
रेल्‍वे खात्‍याच्‍या या निर्णयामुळे व्‍यापारी व नोकरदारांना हक्‍काची गाडी उपलब्‍ध होणार आहे. विशेषत: मुंबईला उपचारासाठी जाणार्‍या रुग्‍णांची मोठी सोय होईल. शिवाय भाड्यात कपात होणार असल्‍याने विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्‍यान, आगामी काळात या गाडीच्‍या फेर्‍या वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू असल्‍याचे रावल यांनी म्‍हटले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button