तुटवडा नाही तरी शहाद्यात रेखा इण्डेन गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा; सिलिंडरसाठी तासन्तास प्रतीक्षा, प्रशासनाच्या हस्तक्षेपाची मागणी
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : एकीकडे जिल्हाभरात कुठेही गॅस व इतर इंधनाची टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी शहाद्यात मात्र रेखा इण्डेन गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. या एजन्सीत सिलिंडरसाठी तासन्तास रांगा लावाव्या लागत असल्याने ग्राहक संतापले असून, प्रशासनाने लक्ष घालून एजन्सीच्या कारभारात हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
शहादा शहरातील रेखा इण्डेन गॅस एजन्सीकडून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. गुरुवारीही (दि. २) या एजन्सीसमोर सिलिंडरसाठी वाट पाहावी लागत असल्याने ग्राहक संताप व्यक्त करीत होते. एजन्सीचे कार्यालय नियमित वेळेवर उघडले जात नाही. सकाळपासून रांगेत उभे राहिलेल्या ग्राहकांना सिलिंडरसाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागते. अनेक वेळा कर्मचारी उशिरा येत असल्याने कामकाज सुरू होण्यास विलंब होतो. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कामावर जाणार्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, असा आरोप काही ग्राहकांनी केला. महिनाभरापूर्वी बुकिंग करूनही गॅस सिलिंडर मिळत नसल्याची तक्रारही काही जणांनी केली.
दरम्यान, दररोज केवळ २० सिलिंडरच्या पावत्या दिल्या जातील, अशी सूचना एजन्सीच्या बाहेर लावण्यात आली असून, त्यामुळे गर्दी करूनही उर्वरित ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्याचवेळी एजन्सीत ई-केवायसी प्रक्रिया करणारे संबंधित कर्मचारी वेळेवर उपलब्ध राहत नसल्याने वारंवार चकरा माराव्या लागत असल्याचेही काही ग्राहकांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाने गॅसचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. तरीही या एजन्सीकडून ग्राहकांना वेळेत सिलिंडर पुरवठा होत नसल्याने ‘घोडे नेमके कुठे पेंड खाते’ असा प्रश्न पडला असून, प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून हा प्रश्न मिटविण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. दरम्यान, या संदर्भात प्रतिक्रियेसाठी प्रयत्न करूनही गॅस एजन्सीशी संबंधितांशी संपर्क होऊ शकला नाही.



