श्री खंडेराव महाराजांच्या जयघोषाने दणाणली प्रकाशानगरी; रिमझिम पावसातही बारागाड्यांची लांगड ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी ओसंडली गर्दी

प्रकाशा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या प्रकाशानगरीत शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असलेला श्री खंडेराव महाराज यात्रौत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय उत्साहात पार पडला. वादळी वारा आणि अवकाळी पावसातही या यात्रेनिमित्त पार पडलेल्या बारागाड्यांची लांगड ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रकाशासह परिसरातील श्री खंडेरायाच्या भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ‘यळकोट यळकोट जय मल्हार आणि श्र खंडेराव महाराज की जय’ अशा गर्जनांनी अवघा परिसर दुमदुमून गेला होता.
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला श्री खंडेराव महाराज यात्रा भरते. या यात्रेला सुमारे शंभरपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. गुरुवारी (दि. २) चैत्र पौर्णिमेला हा यात्रौत्सव पार पडला. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाभरात अवकाळी पावसाचे वातावरण होते. बुधवारी देखील दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा सुटून वातावरणात मोठा बदल झाला. त्यातच १५ ते २० मिनिटे रिमझिम पावसानेही हजेरी लावली. पाऊस वाढून यंदाच्या उत्सवावर पाणी फेरले जाते की काय, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र, यामुळे भाविकांच्या उत्साहावर काहीही फरक पडला नाही. उलट वारा व पावसामुळे आल्हाददायक वातावरण तयार होऊन गरमी कमी झाली होती.
संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारात बारागाड्यांची लांगड ओढण्याचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला. शशिकांत लांडगे यांनी सपत्नीक पूजा केल्यानंतर मुख्य भगत सीताराम झिंगाभोई यांच्या घरापासून श्री खंडेराव महाराज मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सीताराम भगत यांनी खंडेराव महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ही मिरवणूक वाजत-गाजत आनंदी मातेच्या दर्शनासाठी निघाली. यावेळी रिमझिम पावसातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आनंदी मातेच्या दर्शनानंतर हनुमान व भैरवनाथाचे दर्शन पार पडले. यानंतर ही मिरवणूक पुन्हा खंडेराव महाराज मंदिराकडे परतली.
भंडार्याची उधळण सुरू असताना सीताराम भगत यांनी बारागाडी लांगडला पाच प्रदक्षिणा घातल्या. यावेळी अबाल वृद्धांकडून यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर सुरू होता. पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर लांगडच्या ठिकाणी ज्योत पेटवून लगेच बारागाड्यांची लांगड ओढण्यात आली. सीताराम भगत यांनी सुमारे ५०० फुट ही लांगड ओढून आणली.
अतिशय उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यानंतर प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता. दरम्यान रात्री उशीरापर्यंत श्री खंडेराव महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग दिसून आली.



