‘तापी’च्या पात्रात सापडला शहाद्यातील लिपिकाचा मृतदेह; दुचाकी टाकरखेडा शिवारातील हॉटेलजवळ सापडली, अकस्मात मृत्यूची नोंद

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहाद्यातील विकास हायस्कूलमधील लिपीक गिरीश यशवंत कुलकर्णी (४१) यांचा धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा शिवारातील तापी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुलकर्णी यांची दुचाकी घटनास्थळापासून जवळच असलेल्या एका हॉटेलजवळ सापडली असून, या प्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असली तरी पोलिस सर्व शक्यतांच्या अनुषंगाने तपास करीत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाद्यातील रश्मीनगर भागात राहणारे गिरीश कुलकर्णी कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून सकाळी दुचाकी घेऊन घराबाहेर पडले होते. मात्र, संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. याच दरम्यान कुलकर्णी यांची दुचाकी शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा शिवारात एका हॉटेलजवळ उभी असल्याची माहिती मिळाल्यावर कुटुंबियांनी तिकडे धाव घेतली. येथून जवळच तापी नदीच्या पात्रात सारंगखेडा बॅरेज असल्याने कुलकर्णी यांच्या कुटुंबाला शंका आली. त्यांनी तापी नदीपात्राकडे धाव घेत नदीच्या पात्रात कुलकर्णी यांचा शोध घेण्यासाठी मच्छिमारांना विनंती केली.
मच्छिमारांनी बराच वेळ शोध घेतल्यावर अखेर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कुलकर्णी यांचा मृतदेह बॅरेजमध्ये हाती लागला. तातडीने याबाबतची माहिती सारंगखेडा पोलिसांनी देण्यात आली. सारंगखेडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर शहादा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, तूर्तास या प्रकरणी सुहास राजेंद्र कुलकर्णी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. गिरीश कुलकर्णी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.



