मुख्य बातम्या

शहादावासीयांच्‍या प्रेमाची शिदोरी सोबत घेऊन जातोय; मावळते प्रांताधिकारी कृष्‍णकांत कनवारिया यांनी जागवल्‍या आठवणी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्‍याचा प्रांताधिकारी म्‍हणून काम करताना नेहमीच उत्‍साहपूर्ण वातावरण राहिले. स्‍थानिक रहिवाशांसह सर्वच राजकीय नेते व पदाधिकार्‍यांच्‍या सहकार्यामुळे कोणत्‍याही कामात अडथळा उभा राहिला नाही. उलट अडलेली कामे मार्गी लावण्‍यात यशच आले. शहादेकरांच्‍या याच प्रेमाची शिदोरी घेऊन आता नव्‍या ठिकाणी जात आहे. पण शहादेकरांचे प्रेम नेहमीच लक्षात राहील, हे शब्‍द आहेत शहाद्याचे मावळते प्रांताधिकारी (सहायक जिल्‍हाधिकारी) कृष्‍णकांत कनवारिया यांचे.
राज्‍य शासनाने बुधवारी राज्‍यातील २१ वरिष्‍ठ आयएएस अधिकार्‍यांच्‍या बदलीचे आदेश काढले. यात नंदुरबार जिल्‍ह्यातील शहाद्याचे सहायक जिल्‍हाधिकारी कृष्‍णकांत कनवारिया आणि नंदुरबारच्‍या सहायक जिल्‍हाधिकारी अंजली शर्मा यांचाही समावेश आहे. आता कनवारिया यांची जालना जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, तर शर्मा यांची जालना महापालिकेच्‍या आयुक्‍त म्‍हणून नियुक्‍ती झाली आहे. हे दोघेही येत्‍या सोमवारी (दि. ६) नव्‍या पदांचा पदभार हाती घेणार असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्‍यान, ‘नंदुरबार पोस्‍ट’ने कनवारिया यांच्‍याशी त्‍यांच्‍या शहादा येथील अनुभवाबाबत संवाद साधला. ते म्‍हणाले, २९ जानेवारी २०२५ रोजी शहाद्यात रुजू झालो. तेव्‍हापासून आजपर्यंत कधीही कामात अडथळा आलाच नाही. येथील लोकांनी नेहमी सहकार्यच केले. महसूल विभागाचा अनुभव छानच होता. आलो त्‍यावेळी तापी पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली होती. तर गोमाई नदीवरील पुलाचे काम बाकी होते. सर्वांच्‍या सहकार्यामुळे हे काम मार्गी लावण्‍यात यश आले. हे काम आता पावसाळ्‍याच्‍या आधीच म्‍हणजे मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
माझ्‍याच कार्यकाळात शहादा नगर परिषदेची निवडणूक कोणत्‍याही अडथळ्‍यांविना पार पाडली, याचा आनंद आहे. या काळात सर्व राजकीय नेत्‍यांनी, न.प.च्‍या आजी–माजी पदाधिकार्‍यांनी सहकार्य केल्‍यानेच हे दिव्‍य सहज व सोप्‍या पद्धतीने पार पडू शकले. त्‍यामुळे हे फक्‍त माझे नाही, तर सर्व शहादेकरांचे यश आहे, अशा शब्‍दांत कनवारिया यांनी सर्व स्‍थानिकांचे ऋण व्‍यक्‍त केले.
सध्‍या मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेली विशेष माहिती पुनरावलोकन (एसआयआर) मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आतापर्यंत या मोहिमेंतर्गत मतदारांच्‍या सहकार्यामुळे शहादा तालुक्‍यात ७० टक्‍के काम पूर्ण झाल्‍याची माहितीही कृष्‍णकांत कनवारिया यांनी दिली.
जालन्‍यात काम करण्‍यासाठी उत्‍साह वाढला
एकंदरीत शहादा शहर व तालुकवासीयांच्‍या प्रेमामुळे कामाचा उत्‍साह वाढला असून, हाच उत्‍साह जालना या नवीन कामाच्‍या ठिकाणी कामात येईल, असा विश्‍वासही कनवारिया यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. पण शहादाकरांशी ऋणानुबंध कायम राहील, असेही ते म्‍हणाले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button